– भाजपच्या मध्य नागपूर कार्यकारीणीची बैठक
नागपूर :- ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपचा ‘पार्टी विथ डिफरन्स’ असा उल्लेख केला होता. कारण आपला पक्ष कुण्या एका परिवाराचा नाही. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्तेच या पक्षाचे मालक आहेत आणि कार्यकर्ता हीच पक्षाची सर्वांत मोठी ताकद आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांनी आज (रविवार) येथे केले.
भाजपच्या मध्य नागपूर कार्यकारीणीची बैठक रजवाडा पॅलेस येथे आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र कुकडे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, आमदार विकास कुंभारे, श्रीकांत आगलावे आदींची उपस्थिती होती. ना. गडकरी म्हणाले, ‘मी लाऊडस्पिकरवर अनाऊन्समेंट करायचो. पोस्टर चिपकवायचो. सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम केले. श्रद्धेय अटलजींनी पक्षाचे अध्यक्षपद भूषविले, त्या जागेवर मला बसता आले, हे माझे भाग्य आहे.’ पक्ष अतिशय प्रतिकुल परिस्थितीत होता. त्यावेळीही लोक काम करत होते, याचाही त्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले, ‘कार्यकर्ता जाती-धर्म-पंथाने मोठा होत नाही. तो कार्य आणि कर्तृत्वाने मोठा होतो. त्यामुळे जातीवादाचे समर्थन न करता आचरण चांगले ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. आपला कार्यकर्ता हाच आपला परिवार आहे.
कार्यकर्त्याच्या सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक सुख-दुःखाशी नेत्यांनी समरस व्हावे. आपला नेता आपल्यासोबत उभा राहील असा विश्वास कार्यकर्त्याला बसला तर त्याच नेत्यासोबत कार्यकर्त्याचे उत्तम संबंध निर्माण होतात. आणि तो कुठल्याही अपेक्षेविना नेत्याचे काम करतो.’