मुंबई :– आपत्कालिन कोविड प्रतिसाद कार्यक्रमाअंतर्गत बांधकामाची 75 टक्के कामे प्रगतीपथावर आहेत. या कामाच्या निविदा ई-टेंडर पद्धतीने करण्यात येत असून, पारदर्शक पद्धतीने कामे झाली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी विधान परिषदेत दिली.
आपत्कालीन कोविड प्रतिसाद कार्यक्रमाअंतर्गत होणाऱ्या कामांना विलंब झाला असल्याप्रकरणी लक्षवेधी सूचना सदस्य महादेव जानकर यांनी मांडली. यास उत्तर देताना आरोग्य मंत्री प्रा. सावंत बोलत होते.
मंत्री तानाजी सावंत म्हणाले की, फिल्ड हॉस्पिटल बांधकामासाठी ई-निविदा काढण्यात आल्या असून, गुणवत्ता आणि संरचनात्मक डिझाईन करण्यासाठी व्हीजेटीआय व व्हीएनआयटी सारख्या त्रयस्थ शैक्षणिक संस्थाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त झाल्याशिवाय पुढील कामाला मंजुरी दिली जात नसल्याने सर्व कामे पारदर्शक पद्धतीने होत असल्याची माहिती यांनी मंत्री प्रा.सामंत यांनी दिली. तसेच फिल्ड हॉस्पिटलसाठी जागेची उपलब्धता न झाल्यामुळे कामास विलंब झाला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 2020-21 मध्ये 13 (मदर ॲण्ड चाइल्ड हेल्थ केअर) एमसीएच विंग तयार करण्यात येणार असून, त्यांची किंमत 272 कोटी होती. या कामाचे नकाशे मंजूर झाले आहेत. ई- टेंडरिंग पूर्ण होऊन त्याचीही कामे सुरू झाली आहेत. सार्वजनिक आरोग्य संस्थांच्या बांधकामाकरिता सार्वजनिक आरोग्य विभागाचा स्वतंत्र बांधकाम कक्ष स्थापन करण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही मंत्री प्रा. सामंत यांनी सांगितले.