भंडारा :- जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत एकूण 44 दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले. जिल्ह्यात दुधाचे प्रमाण वाढविण्यासाठी ध्येय निश्चित करून काम करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
महिला आर्थिक विकास महामंडळ भंडाराच्या वतीने आज दिनांक 14 डिसेंबर 2022 रोजी परिषद कक्ष जिल्हाधिकारी कार्यालययेथे विभागांची समन्वयक बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सुनिल विचनकर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय. एस. वंजारी, कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी पी. पी. गिदमारे, आत्माचे पि.ए. देशमुख, पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद भंडाराचे डॉ. सुशील भगत, उपविभागीय कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी डॉ. मीना चिमोटे, दिनशा डेअरीचे उपाध्यक्ष डॉ. ए. के. उपाध्याय, डॉ. संजय पाटीदार, संजय महाले उपस्थित होते.
महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत महिला बचत गटांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देऊन महिलांना व त्यांच्या कुटुंबांना आर्थिक सक्षम करण्यासाठी व बचत गटातील महिलांच्या माध्यमातून पशुधन वाढविण्याच्या दृष्टीने तसेच जिल्ह्यात दुधाचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. यावेळी माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे यांनी माविमच्या कामाचे सादरीकरण केले.
महिला आर्थिक विकास महामंडळ भंडारा अंतर्गत जिल्ह्यात दुग्ध संकलन केंद्र सुरू करण्यात आले असून दुधाचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने बचत गटातील महिलांच्या माध्यमातून दुधाळ जनावरांचे प्रमाण वाढवून तसेच जनावरांच्या आरोग्य संदर्भात पशुसंवर्धन विभागाचे सुद्धा मार्गदर्शन देण्यात आले. शासनाच्या विविध विभागाकडे कार्यरत योजनांचा लाभ बचत गटातील महिलांना त्यांचे आर्थिक विकास करण्यासाठी कसे करता येईल यावरही चर्चा करण्यात आली.