करदात्याप्रती सहृदयता जपत सक्षम व पारदर्शीपणे काम करा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

– राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या ७८ व्या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन

नागपूर :-  करदात्यांकडून कररूपात मिळणारा पैसा हा त्यांच्यासाठीच आवश्यक पायाभूत सोयीसुविधा निर्मितीसाठी वापरात येतो. हा संदेश विविध माध्यमातून त्यांच्यापर्यंत सकारात्मक पद्धतीने पोहोचविण्याची गरज आहे. आयकर अधिकाऱ्यांनीही करदात्यांप्रती सह्रदयता जपत सक्षम व पारदर्शिपणे काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत भारतीय राजस्व सेवेच्या ७८ व्या तुकडीच्या प्रशिक्षण सत्राच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करतांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन बोलत होते. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सदस्य हरिंदर बीर सिंग गिल, प्रधान महानिदेशक (प्रशिक्षण) संजय बहादुर, राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे महानिदेशक (प्रशिक्षण) पी. सेलवा गणेश, अपर महानिदेशक (प्रशासन) मुनीष कुमार, अपर महानिदेशक शिदारामप्पा कपटनवार, अप्पर महानिर्देशक आकाश देवांगन, अपर महानिदेशक अंकुर आलिया, प्रशिक्षणार्थी आयकर अधिकारी व त्यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, उत्कृष्ट प्रशासक म्हणून घडविणारे हे प्रशिक्षण या तुकडीला परिपूर्ण करणार आहे. हे प्रशिक्षण अधिकाऱ्यांच्या कारकिर्दीचा महत्वाचा टप्पा असून त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यात राष्ट्रीय कर अकादमी महत्वाची भूमिका पार पाडेल. करदात्यांसोबत योग्य व्यवहार करुन करसंकलन करणे हे अधिकाऱ्यांचे कर्तव्य असेल. आपले कर्तव्य बजावताना आदर्श परिमाणांसोबत तडजोड न करता नैतिकता व सदाचाराचे पालन करुन या पदाला योग्य न्याय द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीने आपली गौरवशाली परंपरेची जोपासना करुन अधिकाधिक प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले आहे. यावर्षीची ७८ वी तुकडी प्रशिक्षित होत आहे हे अभिमानास्पद आहे. २०४७ पर्यंत भारत एक विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प आपण पुर्णत्वास नेणार आहोत. त्या करता त्यांचाही मोलाचा वाटा आणि सहभाग असणार आहे, असा आशावादही राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी व्यक्त केला.

तत्पूर्वी, अकादमीचे अंकुर आलीया यांनी ७८ व्या तुकडीतील प्रशिक्षणार्थीविषयीची माहिती दिली. कार्यक्रमापूर्वी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

*१६ महिन्यांचे सेवा पूर्व प्रशिक्षण*

नॅशनल ॲकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस अर्थात राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी ही केंद्र शासनाच्या भारतीय महसूल सेवा अधिकाऱ्यांसाठी (आयकर) सर्वोच्च प्रशिक्षण संस्था आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससीद्वारे आयोजित नागरी सेवा परीक्षाद्वारे आयआरएस अधिकाऱ्यांची भरती केली जाते. थेट भर्ती झालेले हे अधिकारी क्षेत्रीय कार्यालयात नियुक्ती करण्यापूर्वी एनएडीटी, नागपूर येथे 16 महिन्यांचे सेवा पूर्व प्रशिक्षण पूर्ण करतात.

*१४५ अधिकारी प्रशिक्षणार्थी*

78 व्या तुकडीच्या नवीन बॅचमध्ये रॉयल भूतान सर्व्हिसच्या 2 अधिकाऱ्यांसह 145 अधिकारी प्रशिक्षणार्थी आहेत. राष्ट्राच्या विकासात प्रभावीपणे योगदान देण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि मानसिकतेसह हे प्रशिक्षण सुसज्ज करते. इंडक्शन ट्रेनिंगची प्रशिक्षण पद्धत विकसित भारत या संकल्पनेवर आधारित आहे. अधिका-यांमध्ये उत्कृष्टता, उत्तरदायित्व आणि नवोपक्रमाची संस्कृती वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले जाते . कार्यक्रमात वर्ग सत्रे, व्यायाम, केस स्टडी आणि परस्पर चर्चा यांचे मिश्रण समाविष्ट आहे, ज्यामध्ये कर प्रशासन, नेतृत्व आणि सार्वजनिक सेवेच्या विविध पैलूंचा समावेश आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपातील विविध संवर्गातील पदोन्नतीस मुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता

Tue Dec 17 , 2024
– हिवाळी अधिवेशनात नागपूरसाठी प्रशासकीय दृष्टया महत्वाचा निर्णय : मनपातील ४५ अधिकाऱ्यांना पदोन्नती नागपूर :- राज्याची उपराजधानी नागपूर शहरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर शहरासाठी प्रशासकीय दृष्टया महत्वाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. नागपूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी राज्य शासनाला प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला हिरवी झेंडी दाखवित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!