·आदिशक्ती सन्मान सोहळा
· आदिवासी विकास विभागाचा उपक्रम
नागपूर :- सर्वच क्षेत्रांमध्ये आज महिलांनी आपला ठसा उमटविला असून आदिवासी समाजातील महिलाही यामध्ये आघाडीवर आहेत. त्यामुळे महिलांनी संकटामुळे खचून न जाता आत्मविश्वासाने आव्हानांचा सामना करावा, असे माजी महापौर मायाताई इवनाते यांनी सांगितले.
आदिवासी विकास विभागामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कर्तृत्ववान आदिवासी महिलांच्या सन्मानासाठी वनामती येथे आयोजित आदिशक्ती सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या. ज्योत्स्ना रवींद्र ठाकरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या सहआयुक्त बबिता गिरी, सेवानिवृत्त प्राध्यापिका सुमित्रा टेकाम, वर्धा येथील रत्नाबाई विद्यालयाच्या शिक्षिका रेखाताई जुगनाके, दूरदर्शनच्या सहाय्यक अभियंता संध्या किलनाके तसेच आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, उपायुक्त दशरथ कुळमेथे यावेळी उपस्थित होते.
आदिवासी समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असून यामुळे महिलांना नवी ऊर्जा मिळेल. तसेच या महिलांना एकाच मंचावर आणून त्यांचे अनुभव, संघर्ष जाणून घेण्याची संधी आदिवासी विकास विभागाने उपलब्ध करून दिली आहे. त्यातून प्रेरणा घेऊन इतर महिलांनीही विविध क्षेत्रात पुढे यावे. तसेच आपल्या समाजाच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन इवनाते यांनी केले.
विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आदिवासी समाजातील महिलांचा सन्मान करण्यासाठी आयोजित आदिशक्ती सन्मान सोहळा प्रेरणादायी असून पुरस्कारप्राप्त महिलांचे अनुभव सर्वांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहेत. आदिवासी विकास विभागामार्फत उपलब्ध शिक्षण सुविधा, विविध योजनांचा लाभ घेवून समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या प्रगतीसाठी प्रयत्न करावेत. नोकरी हे एकमेव उद्दिष्ट न ठेवता स्वतःचा व्यवसाय, उद्योग सुरु करण्यासाठी शिक्षणाचा उपयोग करावा, असे ठाकरे यांनी सांगितले.
नागपूर विभागातील आदिवासी समाजातील शांताबाई कुमरे, अंबिका बंजार, डॉ. उज्ज्वला आत्राम, मनीषा कुलसंगे, अर्चना नाहमुर्ते, वंदना उईके, कांचन पंधरे, मीनल नैताम, शीलाबाई उईके, सुनिता उईके, नेहा उईके, पुष्पा नाईक, फुलवंता बागडेहरिया, लीलाताई आत्राम, वीणा चिमूरकर, जयश्री लटाये, डॉ. शारदा येरमे, कल्पना गावडे, गायत्री कुमरे, कुसुमताई आलाम, रितू कोवे, शालिनी कुमरे, मरसकोल्हे, माधवी धुर्वे आणि प्रभाताई पेंदाम, रंजना मसराम, मनीषा उईके, अनिता पेंदाम, कला वाढवे, सारिका गौतम आदी आरोग्य, प्रशासन, शिक्षण, सामाजिक कार्य, साहित्य, राजकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
गिरी, प्रा. टेकाम, किलनाके, मरसकोल्हे, शांताबाई कुमारे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच प्रभाताई पेंदाम यांनी गौंडी गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली पालटकर, आरती दांदळे यांनी केले, तर मटी यांनी आभार मानले.