मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनसंवाद, जनसहभागाचा अनोखा प्रयोग केला आहे. ‘मन की बात’ द्वारे विकासाच्या प्रक्रियेत सामान्य माणसाचा सहभाग वाढवण्याबरोबरच देशहिताची विधायक कामे करणाऱ्यांना कौतुकाची थाप देत पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या विविधरंगी भाषिक, प्रादेशिक संस्कृतींचा संगम साधला आहे. अशा ‘मन की बात’ चा १०० वा भाग उद्या ३० एप्रिल रोजी सादर होणार असून या ऐतिहासिक क्षणाचे सर्वजण साक्षीदार व्हा, असे आवाहन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी शनिवारी केले. मुंबई भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड, आमदार श्रीकांत भारतीय, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.
वाणिज्य मंत्री गोयल यांनी सांगितले की ३ ऑक्टोबर २०१४ ते ३० एप्रिल २०२३ असे सलग १०० महिने महिन्यातील एका रविवारी पंतप्रधान मोदी नभोवाणीवरून ‘मन की बात’ द्वारे जनतेशी संवाद साधत आले आहेत. ‘मन की बात’ मधून आपल्या भावना व्यक्त करतानाच पंतप्रधान मोदी सामान्य जनतेच्या अपेक्षा, सूचना एकाग्रतेने ऐकतात. एखाद्या सर्वसामान्य माणसाने, संस्थेने, गावाने केलेल्या असामान्य कार्याचे कौतुक करून सर्वांना प्रेरित करण्याचे अनोखे काम पंतप्रधान मोदी ‘मन की बात’च्या माध्यमातून करतात. कोरोना काळात सामान्य माणसाला धीर देणे, कोवीड योद्ध्यांना प्रोत्साहित करणे, लसीकरणाचे आवाहन करणे हे कामही ‘मन की बात’ मधून मोदी यांनी केले. या कार्यक्रमात राजकारण पूर्णतः बाजूला ठेवले जाते. संपूर्ण अराजकीय स्वरुपाच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून भारताचा समृद्ध वारसा, इतिहास याचबरोबर देशाच्या विविध क्षेत्रात होणाऱ्या प्रगतीचे,विकासाचे चित्र जगासमोर उलगडून दाखवत पंतप्रधानांनी देशवासीयांना प्रेरित केले असेही ते म्हणाले.
आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात रेडिओच्या माध्यमातून वय, धर्म, पंथ, भाषा, प्रांत या सर्वांच्या भिंती तोडत समाजातील सर्व घटकांशी ‘मन की बात’च्या माध्यमातून संवाद साधणे ही संकल्पनाच अभूतपूर्व आहे अशा शब्दात गोयल यांनी ‘मन की बात’चे वर्णन केले. संवाद, संदेश व संपर्काचे प्रभावी साधन तसेच कोट्यवधी भारतीयांच्या भाव भावना व्यक्त करण्याचे एकमेव व्यासपीठ म्हणजे ‘मन की बात’ आहे. देशाच्या विकासासाठी सतत कार्यरत या नेत्याने आत्मनिर्भर, विकसित भारताचे दर्शन जगाला घडवले आहे.