नागपूर :-राज्यातील महिला आज आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत आहेत. कमी शिकलेल्या, पण वेगवेगळ्या प्रकारची कौशल्ये असलेल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचतगटांचा मोठा हातभार लागत आहे. महिलांची संघटित ताकद व पारदर्शक सहकाराची प्रक्रिया एकत्र येऊन विविध प्रकारची उद्योजकता निर्माण होत आहे, आणि समाजाच्या प्रगतीला हातभार लावत आहे. या चळवळीतून अनेक प्रकारचे उद्योग जन्माला आले आहेत.
सध्या नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. विधानभवन, परिसरात महिला बचतगटांना उपहारगृह चालविण्यास अनुमती देण्यात आली आहे. विधानसभा परिसरात ज्यूस, उपाहार, जेवणाचे असे एकूण आठ स्टॉल विविध महिला बचत गटांकडून लावण्यात आले
यंदाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशन कालावधीत मा. सदस्य व अधिकारी/कर्मचारी यांना विधान भवन परिसरात खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावे याकरीता (१) बहुजन महिला स्वयंसहायक बचत गट (२) आधार महिला बचत गट, (३) सभ्य महिला बचत गट, (४) तथागत महिला बचत गट, (५) सक्षम महिला बचत गट (६) साक्षी महिला बचत गट (७) सोनाली महिला बचत गट (8) गजानन महिला बचत गट यांना खाद्यपदार्थ पुरविण्यास मा. पीठासीन अधिकारी यांनी अनुमती दिली आहे
सोनाली महिला बचत गट ,नागपूर या बचतगटाच्या भारती वानखेडे याच्यांशी चर्चा करतांना त्या म्हणाल्या, आमचा बचतगट गेल्या 15 वर्षांपासून नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात स्टाँल लावत आहे. शासनाकडून आम्हाला स्टाँल, खुर्च्या, टेबल, पाणी आणि लाईट मोफत देण्यात आले आहे. आमच्याकडील शेंगदाणे आणि तिळाचे लाडू अतिशय प्रसिद्ध आहेत. नेहमी अधिवेशनासाठी येणारे अधिकारी कर्मचारी आणि कार्यकर्ते आवर्जून लाडू खाण्यासाठी येतात. गावी घेऊन जाण्यासाठी खरेदी करतात. आम्हाला जी ऑर्डर मिळते ती पूर्ण करण्यासाठीही वेळ अपुरा पडतो. नाश्ता, वैदर्भीय पद्धतीचा चविष्ट शाकाहारी आणि मांसाहारी जेवण आमच्या स्टॉलवर असते, त्यामुळे अनेक आमदार आमच्या स्टॉलवर एकदातरी भेट देऊन जेवणाचा आस्वाद घेतात. आमदार रोहित पवार यांनी आमच्या सोनाली महिला बचत गटाच्या जेवणाविषयी ट्विट करून कौतुक केल्याने आमचा उत्साह वाढला आहे आणि आमच्याकडे जेवणासाठी येणाऱ्यांची संख्याही.
बहुजन महिला बचत गटाच्या वंदना लांजेवार यांनी सांगितले. विधानभवन परिसरात शासनाकडून देण्यात आलेल्या या स्टॉलमुळे आमच्या गटातील महिलांना काही दिवसतरी रोजगार उपलब्ध झाला आहे. गाळा उपलब्ध करून देण्यात आला आहे. सर्व मोफत सेवा देण्यात आली असल्याने आम्ही बचत गटाच्या माध्यमातून लागणारे साहित्य आणून गरम जेवण तयार करून देतो. हिवाळी अधिवेशनात आम्हाला स्टॉल उपलब्ध करून दिला त्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करते. नवीन बचतगटांना स्टॉल देताना बचतगटांना मेनू ठरवून दिल्यास सर्वांचा व्यवसाय चांगला होवू शकेल, अशी सूचना त्यांनी केली.
सभ्य महिला बचत गटाच्या ममता गेडाम यांनी सांगितले, आमच्या बचतगटांच्या महिलांना अधिवेशन काळात रोजगार उपलब्ध झाला आहे. आम्ही तयार केलेल्या विविध प्रकारच्या स्वादिष्ट खाद्यपदार्थाचा ग्राहक आनंदाने आस्वाद घेतात, याचा आम्हा महिलांना आनंद वाटतो.
संत गजानन महिला बचत गटाच्या विद्या सेलूकर म्हणाल्या, आम्ही शुद्ध शाकाहारी जेवण ग्राहकांना देतो.सर्वात महत्वाचे आम्ही स्वच्छतेकडे.