नागपूर :-दि. 14/12/2024 रोजी दु. 1.30 वाजता हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलीस मुख्यालयातील शिवाजी स्टेडियम येथे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे बंदोबस्ताबाबत ब्रीफिंग आयोजित करण्यात आली होती. या ब्रीफिंगला पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी उपस्थित राहून उपस्थित पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना मार्गदर्शन केले. नागपूर शहर आणि बाहेरील जिल्ह्यांतून आलेल्या पोलिसांना हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने होणाऱ्या मोर्चे, आंदोलन, धरणे व उपोषण यासाठी आवश्यक नियोजन व खबरदारीबाबत सूचना देण्यात आल्या. सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची माहिती त्वरित प्रसारित होत असल्याने पोलिसांनी शिस्तीचे पालन करण्यावर विशेष भर द्यावा, असे निर्देश दिले गेले.
हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर शहरातील राजभवन, रामगिरी, देवगिरी, रविभवन, आमदार निवास, नागभवन, हैदराबाद हाऊस, पत्रकार निवास, विमानतळ यांसह विविध ठिकाणी विशेष बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मोर्चा स्टॉपिंग पॉइंट्स म्हणून यशवंत स्टेडियम, टेकडी रोड, मॉरिस कॉलेज, एलआयसी चौक, लिबर्टी चौक यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय खुले कारागृह व महत्त्वाच्या चौकांवरही बंदोबस्त असेल.
पोलीस बंदोबस्तादरम्यान लाठी, उबदार कपडे व आयकार्ड जवळ बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रत्येक अधिकाऱ्याला एक डायरेक्टरी पुरविण्यात येईल, ज्यामध्ये संपर्क क्रमांक व आपत्कालीन समस्या सोडविण्यासाठी उपयुक्त माहिती असेल. आंदोलक व पोलिसांमधील तणाव टाळण्यासाठी पोलीस आयुक्तांनी “गोवारी कांड” घटनेच्या अनुभवांचा उल्लेख केला. त्यांनी अधिकाऱ्यांना तणावमुक्त व संवेदनशील पद्धतीने काम करण्यास सांगितले. नागपूर शहरात कमांड कंट्रोल सेंटरद्वारे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे जोडले गेले असून बंदोबस्त दरम्यान ड्रोनचा उपयोग देखील केला जाणार आहे. संशयास्पद वस्तूंची तपासणी व संवेदनशील भागांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना बीडीडीएसला देण्यात आल्या.
वाहतूक नियोजनासाठी स्वतंत्र बंदोबस्त तयार करण्यात आला असून वाहतूक सुरळीत ठेवण्यावर भर दिला जाईल. पोलीस आयुक्तांनी यावेळी आपल्या कारकिर्दीतील यशस्वी आयोजनांचे उदाहरण देऊन पोलिसांना प्रोत्साहित केले. त्यांनी सांगितले की, नाशिक येथील कुंभमेळा व नांदेड येथील गुरु-दा-गद्दी कार्यक्रमाचे नियोजन करताना त्यांनी ज्या शिस्तबद्ध पद्धतीने काम केले, त्याच धर्तीवर हिवाळी अधिवेशनातील बंदोबस्त पार पाडण्याचे आवाहन त्यांनी केले.
“माझा विश्वास, माझी टीम” या तत्त्वावर काम करून बंदोबस्त अत्यंत शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पाडण्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांनी आपल्या जबाबदाऱ्या समजून घेत त्या उत्तमरीत्या पार पाडाव्यात, असे आवाहन करत पोलीस आयुक्तांनी सर्वांना हिवाळी अधिवेशनाच्या सुरक्षेबाबत शुभेच्छा दिल्या.
सदर ब्रीफिंग मध्ये सह पोलीस आयुक्त निसार तांबोळी यांनी बंदोबस्ताच्या रूपरेषेबाबत सविस्तर आखणी स्वरूप याची मांडणी केली. ब्रीफिंग करिता अपर पोलीस आयुक्त शिवाजी राठोड, प्रमोद शेवाळे, विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, पोलीस मुख्यालयाच्या पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील, परिमंडळ निहाय पोलीस उपायुक्त लोहित मतानी, राहुल मदने, रश्मीता राव तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.