नवयुवक बाल गणेश मंडळ दत्तनगर यांना २१,००० रुपयांचे प्रथम बक्षीस
चंद्रपूर :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत आयोजीत करण्यात आलेल्या गणेशोत्सव देखावे, निबंध स्पर्धा, सेल्फी विथ तिरंगा, क्रीएटीव्ह व्हिडिओ स्पर्धांचे बक्षीस वितरण २ ऑक्टोबर रोजी मनपा राणी हिराई सभागृहात पार पडले. आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना बक्षीस हे धनादेशाद्वारे देण्यात आले . पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन म्हणुन गणेशोत्सव देखावे स्पर्धा घरघुती व सार्वजनिक गणेश मंडळांसाठी आयोजीत करण्यात आली होती. याअंतर्गत गणेश मंडळांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व रेन वॉटर हार्वेस्टींगचे देखावे तयार करायचे होते.परीक्षक म्हणून अॅड. आशीष धर्मपुरीवार, दै. नवभारत जिल्हा प्रतिनिधी संजय तायडे, रिना साळवे यांनी परीक्षण करून उत्कृष्ट सजावटीचा निकाल जाहिर केला. यात नवयुवक बाल गणेश मंडळ,दत्तनगर यांना प्रथम, न्यू इंडिया युवक गणेश मंडळ,भानापेठ यांना द्वितीय तर सार्वजनीक गणेश मंडळ जगन्नाथ बाबा नगर यांना तृतीय क्रमांकाचे बक्षीस धनादेशाद्वारे प्रदान करण्यात आले. घरघुती गणेशोत्सव स्पर्धेत आकाश लांजेकर, प्रदीप आकुलवार, प्रकाश भांदककर यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने आयोजीत निबंध स्पर्धेत १५०० निबंध प्राप्त झाले होते. या सर्व निबंधांचे वाचन करून स्पर्धेचा विषय लक्षात घेऊन गुणानुक्रम देण्याचे कार्य चंद्रपूर बचाओ संघर्ष समिती व मनपा शिक्षकांनी पार पाडले. वर्ग ५ ते ८ या वयोगटात प्रथम सिरमन तिरपुडे, क्षितिज रामटेके, कामाक्षी भांदककर दोघेही द्वितीय, वैष्णवी पवारला तृतीय क्रमांक तर वर्ग ९ ते १२ या वयोगटात प्रथम मृण्मयी वानखेडे, सुरेखा विश्वकर्मा, कांचन मसराम दोघेही द्वितीय तर राधा गुरनुलेला तृतीय क्रमांकाचे रोख पारितोषिक प्राप्त झाले. तसेच प्रोत्साहनपर बक्षीस म्हणुन काही विद्यार्थ्यांना स्कुल बॅग तर इतर सर्व सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
सेल्फी विथ तिरंगा स्पर्धेचा निकाल ईश्वरचिठ्ठीने काढण्यात आला यात प्रथम राजीव राजेश टोंगे, द्वितीय मोहम्मद नजील, यश टोंगेला तृतीय क्रमांकाचे रोख पारितोषिक प्राप्त झाले. क्रीएटीव्ह व्हिडिओ स्पर्धेत प्रथम मझहर खान, द्वितीय रोहीत शिरभाये तर पंकज निमजे यांना तृतीय क्रमांकाचे रोख पारितोषिक प्राप्त झाले.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वोटर कार्ड आधारकार्डला जोडण्याची मोहीम सुरु आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश्य मतदाराची अचूक ओळख निश्चित करणे, नोंदींचे प्रमाणीकरण करणे, एका मतदाराचे नाव एकापेक्षा जास्त वेळा किंवा एकापेक्षा जास्त मतदारयादीत असेल तर ते दुरुस्त करणे, ज्या मतदारांची नावे मतदारयादीत नसतील त्यांची नावे या यादीत नोंदणे असा आहे. त्यामुळे, ज्या लोकांजवळ आधार कार्ड नाही ते दिलेल्या ११ पर्यायी कागदपत्रांपैकी एक (पॅनकार्ड, फोटोसह किसान पासबुक, पासपोर्ट, इपिककार्ड, मनरेगा जॉबकार्ड, आरोग्य स्मार्टकार्ड, ड्रायव्हिंग लायसन, फोटोसह पेंशन कागदपत्र, केंद्र / राज्य शासन कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागातील ओळखपत्र इत्यादी) सादर करू शकतील. ओळखपत्रांच्या आधारे त्यांची नावे मतदारयादीत नोंदता येतील किंवा त्यात दुरुस्ती करता येईल. तेव्हा या आपले वोटर कार्ड आधार कार्डला जोडण्यास सहकार्य करण्याचे आवाहन याप्रसंगी आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले.
याप्रसंगी चंद्रपूर बचाओ संघर्ष समितीचे सदस्य, गणेशोत्सव स्पर्धेचे मुल्यमापन समितीचे सदस्य यांचा मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला. समारंभास उपायुक्त अशोक गराटे, सहायक आयुक्त विद्या पाटील, शहर अभियंता महेश बारई, उपअभियंता अनिल घुमडे, विजय बोरीकर, विधी अधिकारी अनिल घुले, सहायक आयुक्त नरेंद्र बोभाटे, सहायक आयुक्त सचिन माकोडे, शिक्षणाधिकारी नागेश नीत, सिस्टीम मॅनेजर अमुल भुते, इको प्रोचे बंडु धोत्रे, मधुसुदन रुंगठा,डॉ. गोपाल मुंधडा, अॅड.आशीष धर्मपुरीवार, संजय तायडे, रिना साळवे, सुनील नामेवार, सर्व गणेश मंडळांचे प्रतिनिधी,शाळांचे प्रतिनिधी उपस्थीत होते.