– जलअभ्यास डॉ. प्रवीण महाजन यांच्या प्रयत्नाला येणार यश
विदर्भाला सुजलाम – सुफलाम करणारा वैनगंगा – नळगंगा नदी जोड प्रकल्पातील सर्व अडथळे दूर झाले असून येत्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात या प्रकल्पाला लवकरच प्रशासकीय मान्यता मिळेल. या नदीजोड प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या सर्वच मान्यता पूर्णत्वाकडे जात आहे. आता केव्हाही या प्रकल्पाची घोषणा महाराष्ट्र सरकार करू शकेल. 3-4 महीन्यापूर्वी अकोला येथील सभेत महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी जे बोलतोय ते करून दाखवितो असे बोलले होते ती वेळ आता जवळ आलीय. मी 3 नोव्हेंबर 2014 ला पत्र देवून प्रथम मागणी केली होती, त्यानुसार या वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प अहवाल बनवण्यासाठी भारत सरकारच्या, जलसंसाधन नदी विकास व गंगा संरक्षण मंत्रालय यांच्या राष्ट्रीय जलविकास अभिकरणाला जलसंपदा विभागाने कळविले होते. त्याचा सविस्तर अहवाल येताच महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने दि. 27 फेब्रुवारी 2023 ला शासनास सर्व अभ्यास करून प्रकल्प साकारण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या काही अटीच्या आधारे दिल्या होत्या आता त्या अटीची पूर्तता नुकतीच 23 नोव्हेंबरच्या बैठकीत करण्यात आल्याची माहिती मिळते. यासोबतच महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मुबंई यांचा अधिनियम-2005 च्यां कलम 11 (च) नुसार याची मंजूरी लागत असते. प्रकल्प जल वैज्ञानिक दृष्या व्हायबल हावा याकरीता बीसी रेशो 1.5 पुढे असावा. त्याप्रमाणे हा अडथळा सुध्दा दूर करण्यात आला. पाणी उपलब्धता ही 63 टक्के विश्र्वासर्हतेने 1772 दलघमी पाणी उपलब्ध आहे. प्रत्यक्षात यापेक्षा 3 पट पाणी वाहून जात असल्याने हा प्रश्नच नव्हता, परंन्तु शासकीय कामकाजात कागदी घोडे काळे करावे लागत असतात. आता ते सर्व सोपस्कारही पूर्ण झालेत. भविष्यातही या खो-यात पाण्याची चणचण जाणविणार नसल्याने हा प्रकल्प शंभर टक्के होणार यात शंका नाही. याकरीता 2-3 बैठका होवून सुधारीत पाणी उपलब्धता प्रमाणपत्र व प्रकल्प रेश्यू या दोन्ही अडचणी नाशिकच्या बैठकीत दूर करून या सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्याने आता प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी सज्ज आहे. कोणत्याही क्षणी हा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या समोर येईल अन क्षणाचाही विलंब न लागता विदर्भातील भाग्यरेखा लिहिल्या जाईल. 3 लाख 71 हजार 277 हेक्टर असलेला हा भव्य दिव्य नदीजोड प्रकल्पासाठीची प्रशासकीय मान्यता प्राप्त होण्यासाठी आता काही घंटेच बाकी आहेत. माझ्या मनातील ड्रीम प्रकल्प म्हणून, मी प्रथम मागणीकर्ता म्हणून माझ्यासाठी निश्चितच आनंदाची बातमी आहे.
वैनगंगा नदीवरील वाहून जाणारे पा़णी या प्रकल्पामुळे विदर्भाला मिळणार. 1772 दलघमी पाणी उपलब्ध होणार आहे. या नदीजोड योजनेतून सिंचनासाठी 1286 दलघमी पाणी राखीव ठेवले असून यात घरगुती वापरासाठी 32 दलघमी. औद्योगिक वापरासाठी 397 दलघमी. वैनगंगेपासून – नळगंगेपर्यंत पाणी जात असताना वाहन अपव्यय म्हणून 57 दलघमींची तरतूद करण्यात आली आहे.
वैनगंगा ते नळगंगा या नदीजोड योजनेचा कालवा 426.542 किलोमीटर असणार असून, हे पाणी या कालव्याद्वारे थेट बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा पर्यंत जाणार आहे. या कालव्याला काही जोड कालवे सुद्धा असतील, त्यातून 41 साठवण तलावात पाणी नेण्यात येईल. 31 साठवण तलाव नव्याने बांधण्यात येणार असून उर्वरित 10 तलाव अस्तित्वात आहेत. त्यांचा समावेश करण्यात आला, यातील काही तलावांची उंचीही वाढविण्यात येणार आहे.
गोसीखुर्द धरण ते नळगंगा धरण या 426.542 किलोमीटर लांबीच्या कालव्यावर 7 बोगद्यांची योजना असून या बोगद्यांचे अंतर 13.83 किलोमीटर राहील, काही ठिकाणी पीडीएनच्या माध्यमातून 25.98 किलोमीटर पाणी जाईल. 386.73 किलोमीटरचा कालवा हा खुला असेल. या सर्व योजनेत 6 ठिकाणी पंपांच्या साह्याने पाणी उचलून टाकण्यात येणार असून या लिफ्टची उंची 155 मीटर असेल.
88 हजार 575 कोटी रूपये किंमत असलेला हा विदर्भातील सर्वात मोठा प्रकल्प साकार होईल. काही दिवसातच प्रशासकीय मान्यता प्राप्त होवून या भव्य दिव्य नदी जोड प्रकल्पाचा श्रीगणेशा हेईल. या प्रकल्पासाठी भूसंपादन हे 28 हजार 41. 30 हेक्टर जमीन लागणार असून त्यात खाजगी जमीन 18768 हेक्टर असेल. शेतजमिनी 7591.80 हेक्टर आहे. खाजगी जमीन 18768 हेक्टर लागणार आहे. 395.30 हेक्टर वन जमिनीची आवश्यकता या प्रकल्पासाठी राहील. पडीक असलेली जमीन 736.50 हेक्टर असेल. या नदी जोड मार्गावर शासनाची असलेली 609 हेक्टर जमीन लागणार आहे. 201.80 हेक्टर जमीन ही रहिवासी क्षेत्रातली येत आहे, तर जलसाठे असलेली 38.90 हेक्टर जमीनीचा यात समावेश असेल.
वैनगंगा – नळगंगा नदी जोड मार्गावर सहा जिल्हे येत असून, 15 तालुक्यांचा यात समावेश होत आहे. या नदीजोड प्रकल्पामुळे 26 गावे पूर्णता बाधित होणार असून 83 गावे हे अंशता बाधित होतील असा पूर्व अंदाज आहे. संपूर्ण 109 गावांतर्गत 11166 गावकरी बंधू बाधित होणार असून यात एकूण कुटुंब संख्या ही 2646 असेल.
आज विदर्भातील आत्महत्या ग्रस्त भागात हा प्रकल्प साकारत आहे. विदर्भातील गोर गरीब शेतकरी बांधवांसाठी हा प्रकल्प होत आहे. या सहा जिल्ह्यातील सर्वच भागात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. या भागात उन्हाळ्यात दहा – पंधरा दिवस पिण्यासाठी पाणी नसते. हा प्रकल्प झाल्यास पिण्याच्या पाण्याची समस्या संपेल. या प्रकल्पामुळे उद्योग धंदे वाढीस जावून तरूणांना रोजगार मिळेल. शहराकडे जाणारे लोढे या प्रकल्पामुळे थांबतील. या भागातील भगिनींसाठी, नागरिकांसाठी हा आनंदाचा क्षण आहे, अनेक दिवस वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता कधी मिळते याची आतुरतेने आम्ही सर्वजण वाट पाहत होतो. हा सुदिन डिसेंबर मध्ये उगवणार हे ऐकून आनंद झाला. 2014 ला मी नदीजोड प्रकल्पाची केलेली मागणी विदर्भासाठी वरदान ठरणार. या अनुभवाने आज मन सुखावत आहे. गेली 9 वर्ष सतत सरकारच्या माध्यमातून या प्रकल्पाला रेटण्याचा सातत्याने केलेला प्रयत्न आज फळाशी आला आहे. हा प्रकल्प जेव्हा प्रत्यक्षात पूर्ण होईल तेव्हा मी केलेल्या प्रयत्नाला खऱ्या अर्थाने खूप मोठे यश प्राप्त झाले असे समजेल. यासाठी मी माझे मित्र मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांचे मानावे तेवढे आभार कमी पडतील. मी त्यांना धन्यवादही देतो. तत्कालीन जलसंपदा मंत्री व या 9 वर्षात ज्यांनी ज्यांनी नदीजोडसाठी मदत केली त्या जलसंपदाचे सर्व अमुस, सचिव काडा, सचिव प्रकल्प समन्वयक, कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता व जलसंपदातील अभियंते व कर्मचारी यांना धन्यवाद देतो.
डॉ. प्रवीण महाजन, जल अभ्यासक,
डॉ. शंकररावजी चव्हाण राज्यस्तरीय जलभूषण पुरस्कार्थी,
महाराष्ट्र शासन.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा अंतर्गत चला जाणूया नदीला राज्यस्तरीय समिती सदस्य, महाराष्ट्र शासन.