२०२२ च्या जून महिन्यात शिवसेनेचे २ तुकडे करणाऱ्या एकनाथ शिंदेंनी आता उद्धव ठाकरेंची शिवसेना पूरती रिकामीच करायची आहे असे ठरवले आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो आहे. मुंबई आणि ठाणे यांच्या पाठोपाठ शिवसेनेचा जोर होता तो तळकोकणात. मात्र विधानसभा निवडणुकीत कोकणातही शिल्लक म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला भास्कर जाधव वगळता जागा मिळाली नाही. आता उद्धव सेनेचे कोकणातले एक दिग्गज माजी आमदार राजन साळवी यांनी ठाण्याच्या आनंदाश्रमात झालेल्या एका कार्यक्रमात एकनाथ शिंदेंच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या शेकडो समर्थकांसह उद्धवसेना सोडून शिंदे सेनेत प्रवेश केला. त्या पाठोपाठ कोकणातलेच दुसरे माजी आमदार सुभाष बने यांच्यासह अनेक जिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख आणि शेकडो शिवसैनिकांनी देखील एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत रत्नागिरीत शिंदे सेनेत प्रवेश केला. आता कोकणात एकमेव भास्कर जाधव उरले आहेत. ते देखील उद्धव ठाकरेंवर नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. हे बघता कोकणही रिकामे केले जाणार काय अशी शंका येऊ लागली आहे. ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे तिथे शिंदेंनी पहिले जोर मारला. पाठोपाठ मुंबईवरही त्यांनी हळूहळू कब्जा मिळवायला सुरुवात केली आहे. आता ते कोकणातही पाय पसरू लागले आहेत. त्यामुळे ठाकरे सेना पुरती रिकामी करायची असेच त्यांनी ठरवलेले दिसते आहे. मात्र या सर्व प्रकारातून उद्धवपंत ठाकरे यांचे युवराज आदित्य आणि त्यांचे निकटचे सहकारी संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल परब, ही सर्वच मंडळी अजूनही शहाणपणा शिकायला तयार नाहीत. खरे तर त्यांनी असे का घडते आहे याचे आत्मपरीक्षण करायला हवे होते. मात्र तसे न करता ही सर्वच मंडळी विरोधकांवर टीकाटिपणी करण्यातच आनंद मानत आहेत. माझ्या आठवणीनुसार १९९६च्या जून महिन्यात एका ज्येष्ठ राजकीय विश्लेषकाने शिवसेनेत जाऊ बघणाऱ्या एका अपक्ष आमदाराला सुनावले होते की बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर पुढील १० वर्षात शिवसेना संपायला सुरुवात होईल. बाळासाहेबांचे निधन २०१२ मध्ये झाले आणि २०२२ मध्ये म्हणजे बरोबर १० वर्षांनी शिवसेनेला ऐतिहासिक खिंडार पडले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगानेही उद्धव ठाकरेंची शिवसेना ही खरी शिवसेना नाही, तर खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंची आहे, असा निवाडा दिला. त्यामुळे सेनेला अजूनच गळती लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता २० फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विदर्भातही शेकडो शिवसैनिक आणि नेते ठाकरे सेना सोडून शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही. उद्धव पंतांनी या बाबतीत आजच गांभीर्याने विचार करायला हवा. उद्या कदाचित उशीर झालेला असेल.
*मधुचंद्र संपून घटस्फोटाकडे वाटचाल सुरू..*
उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातील जाणता राजा म्हणून ओळखले जाणारे राजनीतीतील चाणक्य शरद पवार यांच्यात ऑक्टोबर २०१९ पासून राजकीय मधुचंद्र सुरू झाला होता. मात्र आता हा मधुचंद्र संपून घटस्फोटाची तर वेळ येणार नाही ना असे चित्र दिसत आहे. झाले असे की गेल्या आठवड्यात सरहद्द या संस्थेतर्फे यंदाचा महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदान करण्यात आला. या सोहळ्याचे प्रमुख अतिथी शरद पवार होते. पवारांनी शिंदे यांच्या डोक्यावर शिंदेशाही पगडी चढवली आणि आपल्या भाषणात शिंदेंची तोंड भरून स्तुती केली. त्यामुळे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत ही सर्वच मंडळी प्रचंड संतापली आहेत.
संतापायला तसेच कारणही आहे. २०१९ मध्ये भाजपाचा साथ सोडून उद्धव ठाकरेंनी शरद पवारांसोबत अभद्र शय्यासोबत केली, आणि ज्या काँग्रेसला बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर विरोध केला त्या कॉंग्रेसला सोबत घेऊन शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी महाआघाडी करत महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सत्तेपासून कायम दूर ठेवले होते. सामान्य शिवसैनिकाला सत्तेचा मुकुट चढवून बाळासाहेब मात्र बाजूला राहायचे. बाळासाहेबांच्या या तत्त्वाला हरताळ फासत उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री बनले. त्यावेळी सर्व सत्तासूत्र शरद पवारांच्या हातात दिली होती. शरद पवारांच्या दादागिरीला त्रासून एकनाथ शिंदे शिवसेनेच्या ५६ पैकी४० आमदारांना घेऊन बाहेर पडले, आणि त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यावेळी ज्या भाजपसोबत युती करून उद्धव ठाकरे निवडणूक लढले होते, त्यांच्याशीच गद्दारी करून काँग्रेससोबत गेल्यामुळे आम्ही सरकारमधून बाहेर पडून भाजपसोबत जात आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते. त्यामुळे ठाकरे पवार दोघेही संतापले होते. मात्र आता टोपी फिरवत त्याच शिंदेंचा पवारांनी गौरव करावा हे ठाकरेंना खूपच खटकले. ज्यांनी महाआघाडी सरकार पाडले, म्हणजेच पर्यायाने महाराष्ट्राशी
गद्दारी केली, त्यांचा सत्कार तुम्ही करायला नको होता, असे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे म्हणणे होते.त्यावरून त्यांनी शरद पवारांवरच टीकास्त्र सोडले. संजय राऊत यांनी तर पवारांच्या या कृत्यामुळे महाराष्ट्राला वेदना झाल्याचे सांगून पवारांनाच फक्त राजकारण समजते असे नाही तर आम्हाला देखील राजकारण करता येते असे ठणकावून सांगितले. त्याला लगेचच शरद पवारांचे निष्ठावंत जितेंद्र आव्हाड यांनी उत्तरही दिले. एकनाथ शिंदे यांनीही शरद पवार यांनी संस्कृती जपली, तर उद्धव ठाकरे यांनी आपली विकृती दाखवली, अशा शब्दात आसूड ओढले. या विषयावर राजकारण चांगलेच रंगले होते.
या संदर्भात दोनच दिवसांनी युवराज आदित्य ठाकरे दिल्लीत गेले असता त्यांनी देखील महाराष्ट्र तोडणाऱ्यांबरोबर पवारांनी जायला नको होते अशा आशयाचे विधान केले. इथे गमतीचा भाग असा की शिवसेना म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र असा आजही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा गोड गैरसमज आहे. प्रत्यक्षात आज शिवसेनेला महाराष्ट्राच्या विधानसभेत २८८ पैकी जेमतेम २० जागा मिळाल्या आहेत. तरीही आम्ही म्हणजेच महाराष्ट्र असा त्यांचा दावा असतो. आता याला शहाणपण म्हणायचे की मूर्खांच्या नंदनवनात फिरणे समजायचे, हे ज्याचे त्यानेच ठरवावे. मात्र जी टेप आदित्य ठाकरेंनी वाजवली, तीच टेप उद्धव ठाकरे, संजय राऊत, अनिल परब, आणि अरविंद सावंतही वाजवतात. आम्ही म्हणजेच महाराष्ट्र असा त्यांचा गोड गैरसमज आहे. त्यातून आता त्यांनी बाहेर यायला हवे. तेच त्यांच्या हिताचे होईल.
कॉंग्रेस पक्षात खांदेपालट…
काँग्रेस पक्षाला अखेर नवे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मिळाले आहेत. त्याचबरोबर विधानसभेतल्या १६ आमदारांचे नेते देखील निवडले गेले आहेत. यापूर्वीचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा गटनेते हे विदर्भातीलच होते. मात्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पूर्व विदर्भातील होते. गटनेते विजय वडेट्टीवार हे देखील पूर्व विदर्भातीलच होते. आता काँग्रेस श्रेष्ठींनी विधानसभा गटनेते म्हणून वडेट्टीवारांनाच कायम ठेवले आहे. मात्र त्याचवेळी प्रदेशाध्यक्ष म्हणून पश्चिम विदर्भातील म्हणजेच बुलढाणा जिल्ह्यातील हर्षवर्धन सपकाळ यांना नियुक्त केले आहे.
हर्षवर्धन सपकाळ हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात फारसे परिचित नाही सपकाळ हे २०१४ ते १९ ही ५ वर्षे विधानसभा सदस्य होते. त्यापूर्वी काही काळ ते बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देखील होते. सर्वोदयी विचाराचे कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जातात. आधीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आक्रमक वृत्तीचे नेते म्हणून ओळखले जात होते. सपकाळ मात्र मावळ प्रवृत्तीचा माणूस म्हणून ओळखले गेले आहेत. आज महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची अवस्था अतिशय दयनीय आहे. एकावेळी विधानसभेतल्या २८८ पैकी २२२ जागा बळकावणारी काँग्रेस आज १६ जागांवर येऊन थांबली आहे. अर्थात असे असले तरी विजय वडेट्टीवार, नाना पटोले, यशोमती ठाकूर, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, विश्वजीत कदम हे सर्वच नेते मुख्यमंत्री बनण्याची स्वप्ने बघत होते. आज मात्र यांच्यापैकी कोणीही प्रदेशाध्यक्षपद स्वीकारायला तयार नव्हते असेही कानावर आले. आधीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे विदर्भातले, त्यामुळे यावेळी कोणीतरी विदर्भाबाहेरचा नेता काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बनेल असा तर्क लावला जात होता. मात्र पुन्हा एकदा हे पद विदर्भातच आले आहे. म्हणूनच प्रदेशाध्यक्षपद स्वीकारायला कोणी तयार नव्हते, ही कानावर आलेली बाब खरी असावी असा अंदाज लावता येतो. आज महाराष्ट्रात काँग्रेसला नवसंजीवनीची गरज आहे. नवे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ही जबाबदारी कितपत सक्षमपणे पेलू शकतात त्यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
मुंडे -धस वाद नव्या वळणावर…
बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे विरुद्ध सुरेश धस हा वाद अजूनही संपायचे नाव काही घेत नाही. मात्र गेल्या आठवड्यात या वादात एक नवा ट्विस्ट आला आहे. त्यामुळे या प्रकरणातील रंगत जरा वाढते आहे. बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुखची हत्या झाली होती. तर सोमेश्वर सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. हा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला, परिणामी हा मृत्यू नसून हत्या आहे असा आरोप केला जात आहे. परिणामी जबाबदार पोलिसांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी पुढे येत आहे. मात्र सुरेश धस यांनी त्या पोलिस अधिकाऱ्यांना माफ करावे अशी भूमिका घेतल्यामुळे काही दिवसांपूर्वी ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होतेच. भरीस भर आता ते त्यांचे विद्यमान दुश्मन राज्य मंत्रिमंडळातील मंत्री धनंजय मुंडे यांना लागोपाठ दोनदा भेटल्याचे वृत्त बाहेर आल्यामुळे अधिकच वादग्रस्त ठरले आहेत. अर्थात धस ज्या भाजपचे आमदार आहेत त्यांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या मदतीला धावून आले आहेत. मात्र तरीही वादाचे मळभ दूर व्हायला तयार नाही. सुरेश धस यांचे विरोधक जितेंद्र आव्हाड, संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख, अंजली दमानिया, हे सर्वच त्यांच्यावर तुटून पडलेले दिसत आहेत. एकूणच हे प्रकरण आता नेमके काय वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनोज जरांगे यांचे मराठा समाजातील वर्चस्व कमी करावे यासाठीच भाजपने सुरेश धस यांना पेरले, आणि त्यांनी संतोष देशमुख प्रकरण लावून धरले, असा आरोप शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांचे साधे डोळ्याचे ऑपरेशन झाले होते. त्यांना लगेच भेटायला जाण्याची काहीच गरज नव्हती असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. आता या प्रकरणात सुरेश धस आणि धनंजय मुंडे नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
– अविनाश पाठक