संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 22:-कामठी तालुक्यातील नेरी तसेच बिना रेती घाटाच्या निर्धारित डेपो मधून दररोज एका रॉयल्टी वर चाळीस च्या वर ट्रक ने वाळू वाहतूक होत असून नदीतून बिनधास्तपणे अवैध उत्खनन सुरू आहे.ज्यामुळे लाखो, कोटी रुपयांची रेती तस्करांच्या घशात जात असून महसूल व पोलीस प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षितांमुळे महसूल प्रशासनाचा महसूल बुडत आहे तर रेती तस्करांचे चांगलेच फावले आहे.तर या रेती तस्करांना महसूल प्रशासन तसेच पोलीस प्रशासनातील काही विभीशन सहकार्य करीत असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे वरिष्ठांनी अशा विभीषणांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे.तसेच वरिष्ठांच्या डोळ्यात धूळ घालून ही अवैध वाळू वाहतूक शहरात करण्यासाठी वाळू तस्करबाजाकडून वसुली करणारा पोलीस विभागातील तो विभीषण कोण?हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
कामठी तालुक्यातील रेती घाटातून रेती तस्करांचा उतमाच सुरू आहे. तालुक्यात दैनंदिन 40 च्या वर ट्रकने रेतीची अवैध वाहतूक सुरू आहे.या रेतीच्या उपस्यामुळे एकीकडे पर्यावरणाचा ऱ्हास तर दुसरीकडे शासनाचा लाखो ,करोडोंचा महसूल सुद्धा बुडत आहे.रेती तस्करावर कार्यवाही करण्याचे प्रमुख अधिकार महसूल तसेच पोलीस विभागाकडे आहे.मात्र बऱ्याच महिन्यापासून रेती तस्करावर कार्यवाही होत नसल्याने रेती तस्कर सैराट झाले आहेत.
रेती तस्करी मध्ये अनेक गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तींचा समावेश आहे.त्यातील अनेकांवर रेती चोरीसह,
अधिकारी कर्मचाऱ्यांना धमकावणे ,
शासकीय कामात अडथळा निर्माण करणे,जीवे मारण्याची धमकी देणे आदी गुन्हे सुद्धा दाखल आहेत.रेतीचा उपसा करणाऱ्यावर मात्र महसूल तसेच पोलिसांच्या वतिने कठोर कार्यवाही होत नसल्याने रेती तस्करीच्या माध्यमातुन येथे एखादा मोठी अनुचित घटना घडण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.विशेष म्हणजे रेती तस्करकडून मिळणाऱ्या चिरीमिरीमुळे पोलीस आणि महसूल विभागाचे संधीसाधू अधिकारी,कर्मचारी त्यांच्यवर कार्यवाही करण्यास टाळत असल्याचा आरोप करण्यात येत आहे त्यामुळे या दोन्ही विभागाच्या कर्तव्यदक्ष अधिकारी, कर्मचाऱ्यानी पुढाकार घेऊन रेती तस्करांच्या मुसक्या आवळाव्या व वरिष्ठांच्या डोळ्यात धूळ झोकून वसुली करणाऱ्या पोलीस खात्यातील त्या विभीषण चा शोध घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.