नागपूर :- मणिपूरच्या घटनेमुळे देशाची प्रतिमा डागळली जात असून याचा आता राजकीय वापर केला जात आहे. यावर माजी आमदार आणि भाजपा, महाराष्ट्रचे प्रवक्ता डॉ. आशिष र. देशमुख म्हणाले की, “मणिपूर राज्यातील दोन आदिवासी जमातीमधील वाद नवा नाही. अनेक वर्षांपासून त्यांच्यात सातत्याने खटके उडत आहे. मात्र आजवर त्यांनी एकमेकांचे कधी मुडदे पाडले नाहीत. महिलांवर हात उगारला नाही. केंद्रात भाजपचे सरकार आले तेव्हापासून मणिपूर आणि शेजारच्या राज्यांमध्ये शांतता होती. मागील काही वर्षांत हिंसाचार आणि आपसी संघर्षाच्या घटनांचीही नोंद नाही. असे असताना अचानक एका आदिवासी जमातीने दुसऱ्या जमातीच्या महिलांना नग्ण करून, त्यांची काढलेली धिंड ही घटना जरा वेगळी आहे. ती अत्यंत लाजीरवाणी असून त्याचे समर्थन कोणीच करणार नाही. मणिपूरमधील एक व्हीडीओ समजामाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात सैन्याच्या वेशभूषेत काही बंडखोर एक महिलेला बेदम मारहाण करताना दिसत आहे. त्यांच्या हातात अत्याधुनिक बंदुका आहेत. त्यानंतर भर रस्त्यावर तिच्या डोक्यावर गोळ्या झाडून अत्यंत क्रूरपणे तिची हत्या करताना दिसत आहे. हे बघता यामागे कुठल्यातरी अज्ञात शक्तीचा हात असाव अशी शंका बळावते. मणिपूरच्या घटनेमुळे देशाची प्रतिमा डागळली जात असून याचा आता राजकीय वापर केला जात आहे. विरोधकांनी संसदेचे कामकाज रोखून ठेवले आहे. सरकारने चर्चेची तयारी दर्शवली असताना गोंधळ घातला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याची घोषणा केली आहे.
मागील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात विधानसभेच्या निवडणुकीत मणिपूर एकदम शांत होते. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने ६० पैकी ३२ जागा जिंकल्या. याशिवाय भाजपच्या मित्र पक्षानेही काही जागा जिंकल्या. भाजपने एन.बिरेन सिंग यांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसवले. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचे सूत्रे हाती घेताच मणिपूरमधील ड्रग माफीयांवर आपली नजर रोखली. अनेक तस्करांवर कारवाया सुरू केल्या आहेत. मणिपूरमध्ये अफिमची अवैधपणे शेती केली जाते. बंडखोरांकडे ड्रग्स तस्करीतून मोठा पैसा येत असतो. त्याबळावर मणिपूरमध्ये आतंकवादी संघटनेचे चीन आणि म्यानमारच्या अतिरेक्यांसोबत लपून राहिलेली नाही. जून २०१५ साली मणिपूरमध्ये भारतीय सेनेवर युनाइटेड लिबरेशन फ्रंट ऑफ वेस्टर्न साउथ इस्ट एशिया नानावच्या संगठनेने भीषण हल्ला केला होता. त्यात १८ जवान शहीद झाले होते. हल्ला करून अतिरेकी म्यानमारमध्ये पळून गेले होते. त्यानंतर भारतीय सैन्याने त्यांचे सर्व कँप उध्वस्थ केले होते. तेव्हापासून मणिपूरमध्ये अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न सीमेबाहेरून केले जात आहे. चीन आणि पाकिस्ताच्या गुप्तचर संस्था आयएसआय असल्याशिवाय येथील मतैई आणि कुकी समुदायांचे संबंध इतके टोकाला जाऊ शकत नाही. दोन्ही समुदायांमध्ये आपसात संघर्ष आहे. हेवेदावे आहेत. मात्र एकमेकांच्या महिलांवर त्यांनी कधी हात टाकला नाही. एवढ्या टोकाला जाऊन त्यांनी कोणाचे मुडदे पाडले नाहीत.
मणिपूरच्या वादाला आता दुदैवाने धार्मिक रंग दिला जात आहे. त्यापेक्षा अधिक दुर्दैवाची बाब म्हणजे देशातूनच हे प्रयत्न केले जात आहे. मैतेई समाज हिंदू असून त्यांची लोकसंख्या ६४ टक्के आहे. उर्वरितांमध्ये कुकी, नागा व इतर जाती आहेत. कुकींचे मोठ्या प्रमाणात धर्मांतरण झाले आहे. ख्रिश्चन मिशनरी येथे अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. काही कुकी हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही धर्माला मानतात. अशा सामाजिक वातावरणात भाजप सत्तेवर आल्याने या वादाला आता धार्मिक रंग दिला जात आहे. त्यात अधिकाधिक तेल ओतले जात आहे. निव्वळ राजकारणासाठी हे केले जात असेल तर देशाच्या हिताच्या विरुद्धच आहे.
पूर्वोत्तर राज्यांना ५० हून अधिक वेळा भेटी देणारे नरेंद्र मोदी देशाचे पहिले पंतप्रधान आहेत. गृहमंत्री अमित शाह यांची खास नजर या राज्यांवर आहे. मागील नऊ वर्षांत भाजपने केलेला विकास आणि सामाजिक लाभाच्या योजना बघून आठ हजारपेक्षा अधिक युवकांनी शस्त्रे खाली ठेवली आहेत. ते देशाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत. दशकभरातील घटनांची आकडेवारी बघितल्यास पुर्वोत्तर राज्यांमध्ये ६७ टक्के हिंसेच्या घटनांमध्ये कपात झाली आहे. सर्वसामान्यांचे मृत्यू ८३ तर सैनिकांच्या मृत्युची संख्या ६० टक्के कमी झाली आहे. येथे शांतता प्रस्थापित होत असल्याचे बघून देशाच्या शत्रुंमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. कुठल्याही परिस्थितीत मणिपूरला अशांत व भारताला अस्थिर करण्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे. भाडोत्री गुंडाकडून दोन महिलांना नग्ण करून त्यांची धिंड काढण्यात आली. आदिवासींच्या दोन समाजात भांडणे लावून असंतोष निर्माण केला जात आहे. अशा परिस्थितीत काळे कपडे घालून निषेध नोंदवण्याऐवजी विरोधकांनी देशाची एकता आणि शांततेला प्रधान्य देण्याची गरज आहे. देशहितासाठी नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी भक्कम उभे राहण्याची आज गरज आहे. अन्यथा विदेशी शक्ती हळूहळू देशाचे लचके तोडल्याशिवाय राहणार नाही.”