– आतापर्यंत सर्वाधिक काळ नागपुरातील असलेले पोलिस आयुक्तही असल्याचेही बोलले जाते.
नागपुर :- शहर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना शहर आयुक्त म्हणून तीन वर्षे पूर्ण होणार आहेत. गेल्या तीन वर्षांत गुन्हेगारांवर विविध कारवायांच्या माध्यमातून अंकुश ठेवण्यात त्यांनी यश मिळविले. आता त्यांच्या बदलीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. त्यामुळे त्यांच्यानंतर पोलिस आयुक्तपदी कोण विराजमान होणार, याची जोरदार चर्चा उपराजधानी ते राजधानीपर्यंत सुरू झाली आहे.
नागपूर पोलिस आयुक्तांना गृहमंत्रालयाने एक्स्टेन्शन दिले. त्यामुळे अडीच वर्षांच्या कार्यकाळानंतरही त्यांची बदली करण्यात आली नाही. मात्र, ४ सप्टेंबरला ते नागपुरातील सेवेची तीन वर्षे पूर्ण करणार आहेत. आतापर्यंत सर्वाधिक काळ नागपुरातील असलेले पोलिस आयुक्तही असल्याचेही बोलले जाते. अनेक गुन्हेगारांना कारागृहात तर अनेकांवर मोका आणि प्रतिबंधक कारवाई करीत, शहरातील गुन्हेगारांवर त्यांनी नियंत्रण मिळविले.
नागपूर पोलिस आयुक्त पदाच्या शर्यतीत मुख्यमंत्र्याच्या कार्यालयात प्रधान सचिव असलेले संजय सक्सेना आणि अतिरिक्त पोलिस महासंचालक सुनील रामानंद, आशुतोष डुंबरे, रवींद्र सिंघल आणि अनुपकुमार या नावांची चर्चा आहे. यांपैकी अनुपकुमार यांना नागपूरचे सहआयुक्त म्हणून कामाचा अनुभव आहे.
विधी व सुव्यवस्था विभागाचे अपर पोलिस महासंचालकपदावर असलेले संजय सक्सेना त्यात आघाडीवर आहेत. मात्र, वायरलेस विभागाचे अपर पोलिस महासंचालक असलेले सुनील रामानंद हेसुद्धा नागपूर आयुक्तपदाच्या शर्यतीत आहेत. त्यात कोण ‘यशस्वी’ होईल याकडे पोलिस वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून गुन्हेगारांवर कारवाईचे सत्र सुरू केले. त्यातून अनेक गुन्हेगार जेलमध्ये वा शहराबाहेर आहेत. विशेष म्हणजे, शहरातील पोलिसांमध्ये अमितेश कुमार यांचा चांगलाच दरारा आहे. गेल्या काही महिन्यांत कामात हयगय करणाऱ्या अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या त्यांनी क्षणात बदल्या वा निलंबन केले आहे.
राज्यातील तीन पोलिस आयुक्तांची होणार बदली?
राज्यात गेल्या काही महिन्यांत वरिष्ठ अधिकाऱ्यांचा बदल्या करण्यात आल्यात. मात्र, अद्यापही नागपूर आणि ठाणे येथील पोलिस आयुक्तांची बदली करण्यात आलेली नाही. त्यामुळे ठाणे पोलिस आयुक्तपदासाठी आशुतोष डुंबरे यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, नागपुरातही त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. नागपूरसह ठाणे आणि आणखी एका शहरातील आयुक्तांची बदली पुढल्या आठवड्यात होण्याची चर्चा पोलिस वर्तुळात रंगली आहे.