– सुरक्षा रक्षकांना वेतनापोटी प्रत्येकी १९,७५६; पण हातात मिळतात ११ हजार
नागपूर :- भांडेवाडीची सुरक्षा करीत असलेल्या ३० सुरक्षारक्षकांना १२ तासांच्या नोकरीचे वेतन मनपाने १९,७५६ रुपये त्यांना दिले आहेत; पण कंत्राटदार कंपनीकडून केवळ ११ हजार रुपये त्यांच्या वाट्याला येत आहेत. मनपाच्या कार्पोरेट बिल्डिंगमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना यांच्या वेदना का दिसत नाही, असा सवाल या सुरक्षा रक्षकांचा आहे.
महापालिकेने चेन्नईच्या जिग्मा कंपनीला भांडेवाडी प्रकल्पाचे कंत्राट दिले आहे. या जिग्मा कंपनीने आर.डी. प्रोटेक्शन मॅनपॉवर ॲण्ड सर्व्हिसेस लि. या कंपनीला सुरक्षा रक्षक पुरविण्याचा कंत्राट दिला आहे. आर.डी. प्रोटेक्शनचे ३० सुरक्षारक्षक व सुपरव्हायझर येथे १२ तास सेवा देतात. भांडेवाडी म्हणजे शहरातील सर्वाधिक प्रदूषित असलेला परिसर आहे. या सुरक्षा रक्षकांना भांडेवाडीत ट्रकमध्ये येणारा कचरा योग्य ठिकाणी टाकण्याचे व भांडेवाडी डम्पिंग यार्डचे नियंत्रण करण्याचे काम आहे. कचऱ्याच्या ट्रकची एन्ट्री आणि सुरक्षेचे काम आहे. या प्रदूषणात काम करूनही हक्काचे मानधन मिळत नसल्याची या सुरक्षा रक्षकांची खंत आहे. सुरक्षा रक्षकांना आरोग्याचे प्रश्न भेडसावत आहे. त्यांना ईएसआयसीचा दवाखाना लागू आहे; पण औषधोपचार नियमित होत नाही. घाण आणि प्रदूषित वातावरणात काम करीत असल्याने कुटुंबाचेही आरोग्य बिघडले आहे. विशेष म्हणजे बहुतांश सुरक्षा रक्षकांचे सरासरी वयोमान ५० वर्षे आहे.
नगरसेवक व राष्ट्रीय युवक काँग्रेस चे महासचीव बंटी शेळके यांनी बुधवारी या सुरक्षा रक्षकांच्या मागणीसाठी आंदोलन केले. अतिशय घाणेरड्या अवस्थेत राहणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे शोषण थांबविण्याची मागणी केली. भांडेवाडीतच दुसऱ्या भागात मनपाने युनिटी कंपनीकडूनही सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यांना १८ हजार रुपये मानधन देण्यात येते. मग या सुरक्षा रक्षकांना ११ हजार रुपये का? असा सवाल त्यांनी मनपा प्रशासनाकडे केला आहे.