नागपूर :- क्षणिक रागाच्या भरात कायदा हाती घेऊन एखादा गुन्हा, वाईट कृत्य केल्यामुळे गुन्हेगारांच्या वर्तनात सुधारणा व्हावी व केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगताना भविष्यातील संयमी जिवनासाठी आकार देता यावा यासाठी कारागृहांवर दुहेरी जबाबदारी असते. यात ज्यांची लहान मुले आहेत अशा महिला बंदीजनांच्या मुलांच्या वाट्याला अंगणवाडी सुविधेसह उमलण्याचे सारे हक्क मिळावेत यासाठी न्यायालय दक्ष असते. नागपूर मध्यवर्ती कारागृहातील सहा वर्षाखालील 7 मुले व त्यांच्या बंदीजन माता आणि इतर एकूण 114 बंदीजन महिलांशी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सुमारे 45 मिनिटे संवाद साधून भविष्यातील सन्मार्गी जिवनासाठी त्यांचा विश्वास द्विगुणीत केला.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष भूषण गवई यांनी दि.1 डिसेंबर रोजी नागपूर मध्यवर्ती कारागृहास भेट देऊन पाहणी केली. मध्यवर्ती कारागृहातील विविध विभागांचे निरिक्षण करुन तेथील सोई सुविधांचा व कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला. याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही.आर घुगे आणि नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमुर्ती न्यायमूर्ती नितिन सांबरे हे उपस्थित होते.
नागपूर मध्यवर्ती कारागृहात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूर तर्फे कारागृह विधी सेवा केंद्र स्थापित करण्यात आले आहे. या केंद्राला त्यांनी भेट देऊन विधी सेवा केंद्रामार्फत न्यायाधीन बंदी व शिक्षाधीन बंदी यांना देण्यात येणा-या मोफत विधी सेवा, त्यांच्या अधिकाराबाबत माहिती होण्यासाठी घेण्यात येणारी कायदेविषयक जनजागृती शिबिरे, प्राधिकरणाचे लोक अभिरक्षक बचाव प्रणाली कार्यालयाच्या कामकाजाचा विस्तृत आढावा घेतला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूर मार्फत सन 2024 मध्ये सुमारे 2151 गरीब बंदी यांना न्यायालयात केस चालवण्यासाठी मोफत वकील पुरवण्यात आले आहेत. याचबरोबर त्यांनी कारागृहातील उपहारगृहास भेट देऊन बंद्याना देण्यात येणाऱ्या भोजन सेवेची पाहणी केली. तसेच महिला बंदी विभाग व तेथील कौशल्य विकास विभागास भेट देऊन त्यांना पुरवण्यात येणाऱ्या सोई सुविधांची पाहणी केली. कारागृहातील बंद्यानी तयार केलेल्या विविध वस्तु प्रदर्शिनीचे अवलोकन करून त्यांचे कौतुक केले. महिला बंदीजनांच्या लहान मुलांसोबत त्यांनी सुसंवाद साधून मुलांच्या शिक्षणाबाबत केलेल्या तरतुदींचा आढावा घेतला.
या प्रसंगी मान्यवरांचे स्वागत आदिवासी गोंडी नृत्याचे सादरीकरण करून करण्यात आले. तसेच मान्यवरांचे शुभ हस्ते जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूर यांचे कारागृह विधी सेवा केंद्रासमोर वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली येथील संचालक समरेंद्र नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई येथील सदस्य सचिव समिर अडकर, दिनेश पी.सुराणा, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूर, न्यायाधीश सचिन स. पाटील,सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूर, उपसचिव श्रीपाद देशपांडे, कारागृह अधीक्षक वैभव आगे, उप अधीक्षक दीपा आगे, तुरुंग अधिकारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूरचे सदस्य, लोक अभिरक्षक विधीज्ञ, पॅनल अधिवक्ता आणि कर्मचारी उपस्थित होते.