– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पाठबळामुळे झाला इंजिनियर, खामगावच्या महादेव चरपेचा अनोखा संघर्ष
नागपूर :- बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव परिसरातील जळका तेली नावाचे एक छोटेसे गाव. लोकसंख्या जेमतेम बारा-पंधराशे. या गावात वर्षानुवर्षे भाड्याच्या घरात राहणाऱ्या चरपे कुटुंबातील मुलगा इंजिनियर होण्याचे स्वप्न बघतो. आपलं स्वप्न फक्त नितीन गडकरीच पूर्ण करू शकतात, या विश्वासाने नागपूर गाठतो…सहा वर्षांत आपल्या जिद्दीपुढे स्वप्नांना झुकवतो आणि इंजिनियर होऊन एका मोठ्या कंपनीत नोकरीलाही लागतो.
ही संघर्षगाथा आहे महादेव बाळकृष्ण चरपे नावाच्या एका ध्येयवेड्या तरुणाची. वडील एका बंद पडलेल्या कारखान्याचे केअरटेकर आणि आई पुष्पा गृहिणी. महादेवला दहाव्या वर्गात अवघे ४३ टक्के गुण मिळाले, तरीही त्याच्यात इंजिनीयर होण्याची जिद्द निर्माण झाली. त्यासाठी एक निमित्त ठरले. दरवर्षी खामगावमधून शेगाव येथे संत गजानन महाराजांची वारी निघते. एका वर्षी या वारीत महादेवची एका व्यक्तीशी ओळख झाली. ‘आपण काय करता?’ असे त्याने कुतुहलाने त्याला विचारले. ती व्यक्ती वैमानिक असल्याचे त्याला कळले. मग महादेवच्या मनातही वैमानिक होण्याची इच्छा निर्माण झाली. त्यानंतर वैमानिक होण्यासाठी एरोनॉटिकल इंजिनियरिंग आवश्यक असल्याची माहिती तर त्याने काढली; पण, आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. असे असताना एवढे मोठे ध्येय गाठायचे कसे, हा प्रश्न होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपलं स्वप्न पूर्ण करू शकतात, असा विश्वास त्याला होता. पण त्यांच्यापर्यंत पोहोचायचे कसे, हे त्याला कळत नव्हते. काही वर्षांपूर्वी नागपुरात ना.गडकरी यांच्या महाल येथील निवासस्थानी तो पाचवेळा आला. पण प्रत्येकवेळी साहेब नागपुरात नसल्याचे कळल्यामुळे तो परत गेला. त्यानंतर त्याला कार्यालयातूनच शनिवार किंवा रविवारी येण्याचा सल्ला देण्यात आला. त्याप्रमाणे तो एक दिवस आला. सगळी गर्दी ओसरायची वाट बघितली. तो वाट पाहत असल्याचे नितीनजींच्या लक्षात आले. त्यांनी त्याला बोलावले, आस्थेने विचारपूस केली.
ना.नितीन गडकरी यांना महादेव अखेर भेटला आणि त्याने मंत्री महोदयांना आपले ध्येय सांगितले. महादेव ज्या विश्वासाने त्यांच्याकडे आला होता, अगदी त्याप्रमाणे ना. गडकरी यांनी त्याला इंजिनियरींग कॉलेजला प्रवेश मिळण्यासाठी मदतीचा हात दिला. त्यानंतर वसतीगृहातील प्रवेशापासून त्याच्या दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या सर्व सोयींपर्यंत सगळी जबाबदारी ना. श्री. गडकरी यांचे सुपुत्र निखिल गडकरी यांनी सांभाळली. महादेव एरोनॉटिक्समध्ये इंजिनियर झाला. पण पुढचा प्रवास खडतर होता. दरम्यानच्या काळात त्याने हैदराबादमध्ये राहून सॉफ्टवेअरचे कोर्सेस केले. आपला खर्च भागविण्यासाठी एका कॉल सेंटरमध्येही काम केले. कोरोनामुळे काही महिने त्याला वाट बघावी लागली. त्याचे प्रयत्न सुरू होते आणि आता त्याला नागपुरात एका मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी लागली. आज 3 सप्टेंबरला नियुक्तीपत्र घेऊन तो आज थेट मंत्री महोदयांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचला. ‘आपण मदत केली नसती तर आज येथपर्यंत पोहोचू शकलो नसतो’, या शब्दांत कृतज्ञता व्यक्त करताना महादेवचे डोळे पाणावले होते.
ना. नितीन गडकरी यांना आनंद
महादेव आज पुन्हा गर्दीत उभा होता. मंत्री महोदयांनी त्याला लगेच ओळखले, आवाज दिला आणि विचारपूस केली. त्यावर महादेवने नियुक्तीपत्र दाखवले. ना. नितीन गडकरी यांना नियुक्ती पत्र बघून कमालीचा आनंद झाला. त्यांनी महादेवचे भेटवस्तू देऊन अभिनंदन केले. त्याच्यासोबत गप्पा मारल्या. मंत्री महोदयांच्या आदरातिथ्याने महादेव अक्षरशः भारावून गेला.