हिंदू संस्कृती दर्शनातून मराठमोळ्या थाटात नववर्षाचे स्वागत

– भव्य शोभायात्रेने वेधले नागपूरांचे लक्ष 

– अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची उपस्थिती

नागपूर :- पारंपरिक मराठमोठ्या पेहरावातील चिमुकले, महिला आणि नागरिक. प्रभू श्रीरामाच्या पालखीचे संचालन करणाऱ्या ढोलताशा पथकांची प्रत्येक उपस्थितांना ठेका धरायला लावणारी धून. अस्सल मराठमोळ्या नऊवारीत सजलेल्या कलशधारी महिला. प्रभू श्रीरामाच्या दरबाराची झाकी, महाकालची झाकी, उजैन येथील डमरू आणि झांज वादन पथक, राम-सीता-लक्ष्मण यांची पालखी, रथावर स्वार श्रीगणेश, वेशभूषेसह अश्वारूढ बालशिवाजी, महाबली हनुमंताची अनोखी शैली पाहण्यासाठी उपस्थितांची लगबग, लेझीम ताशाच्या तालात तात्या टोपे गणेश मंदिरापासून लक्ष्मीनगर चौकाकडे पुढे सरकत जाणारी प्रभू श्रीरामाची शोभायात्रा, ठिकठिकाणी शोभायात्रेवर होणारा फुलांचा वर्षाव, हा नेत्रदिपक सोहळा कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी चाललेली लहानथोरांची लगबग आणि आसमंत निनादून टाकणारा ‘जय श्रीराम’चा जयघोष…

अशा मंगलमय, उत्साहपूर्ण, चैतन्यदायी वातावरणात हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवित मराठी नववर्षाचे स्वागत झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची याप्रसंगी विशेष उपस्थिती होती. तात्या टोपे गणेश मंदिरापासून सुरू झालेली शोभायात्रेची लक्ष्मीनगर चौकात सांगता झाली. लक्ष्मीनगर चौकात गुढी उभारण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी गुढीचे पूजन केले. याप्रसंगी श्री सिध्दीविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष माजी महापौर संदीप जोशी उपस्थित होते. गुढी पूजनानंतर सामूहिक श्रीरामरक्षा स्तोत्र पठण व आरती झाली.

नववर्ष स्वागत समारंभ समितीच्या वतीने या नववर्ष स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत माता, प्रभू श्रीराम, पवनसूत हनुमान, छत्रपती शिवाजी महारांजाचा जयजयकार करून शोभायात्रेत सहभागी नागपूरकरांचा उत्साह द्विगुणीत केला. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना मा. उपमुख्यमंत्र्यांनी भारतीय संस्कृतीचा गौरव केला. जगातील सर्वात प्राचीन संस्कृती भारतीय आहे. या संस्कृतीला आणि येथील परंपरेला प्रदीर्घ इतिहास असून ही संस्कृती आणि संस्कार जपले जाणे आवश्यक आहे. नवीन पिढीच्या भविष्याकरीता संस्कृतीची जपणूक होणे आवश्यक असल्याचे नमूद करीत देवेंद्र फडणवीस यांनी संस्कृती संवर्धनासाठी घेण्यात आलेल्या संदीप जोशी यांच्या पुढाकाराचे कौतुक करीत संपूर्ण आयोजक मंडळाचे अभिनंदन केले. त्यांनी शोभयात्रा उत्तरोत्तर वाढत जावी व हिंदू गर्जनेचा निदान आसमंती सदैव निनादत रहावा, असे गौरवोद्गार काढून सर्व नागपूरकरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

अनेक टीव्ही मालिका, चित्रपट आणि हास्य जत्रा च्या माध्यमातून आपल्या अभिनयाची अमीट छाप सोडणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनीही ‘जय श्रीराम’च्या जयघोषात नागपुरकरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. नागपुरात आयोजित या भव्य नववर्ष स्वागत सोहळ्याचे त्यांनी कौतुक केले.

माजी महापौर श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी नववर्ष स्वागत सोहळ्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व संस्था, पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले. आरतीने नूतन वर्ष अभिनंदन सोहळ्याची सांगता झालीनूतनवर्ष अभिनंदन समारोह समितीचे सर्वश्री मनोज देशपांडे, गजानन निशीतकर, जयंता आदमने, शंतनू येरपुडे, कौस्तुभ खांडेकर, दर्शन पांडे, मनीष जैन, आशिष पुसदकर, अमोल वटक, अजय डागा, आनंद टोळ, नीरज दोंतुलवार, दिपक वानखेडे, मंगेश उपासनी, सौ. काजल बागडी, अनुसया गुन्ता, डॉ. माधुरी इंदुरकर आदींनी या सोहळ्यासाठी परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यात गेल्या वेळच्या तुलनेत 2 हजार 641 मतदान केंद्रे वाढली

Wed Apr 10 , 2024
– लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात 98 हजार 114 मतदान केंद्रे  मुंबई :- येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात 2 हजार 641 नवीन मतदान केंद्रे वाढली आहेत. यावेळी राज्यात 98 हजार 114 मतदान केंद्रे असणार आहेत. 2004 साली झालेल्या लोकसभा निवडणुकांसाठी एकूण 64 हजार 508 मतदार केंद्रे होती. तर 2009 मध्ये एकूण 83 हजार 986 मतदार केंद्रे स्थापन करण्यात आली. 2014 मध्ये एकूण 91 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!