“पर्यटन, रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधांमध्ये भारताच्या गुंतवणुकीचे स्वागत करू” – अध्यक्ष मोहमद मुइझ्झु

– चित्रपट आणि टीव्ही सिरीयल निर्मात्यांचे देखील मालदीवमध्ये स्वागत

मुंबई :- मुंबई हे भारताचे आर्थिक केंद्र असून महाराष्ट्रात विविध क्षेत्रांमध्ये व्यवसायाची मोठी क्षमता असल्याचे सांगून मालदीव भारताकडून पर्यटन, रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा क्षेत्रामधील गुंतवणुकीचे स्वागत करेल, असे प्रतिपादन मालदीवचे अध्यक्ष डॉ मोहमद मुइझ्झु यांनी आज येथे केले. या संदर्भात उभय देशांनी दिल्ली येथे स्वीकारलेले ‘व्हिजन डॉक्युमेंट’ भारत आणि मालदीवमधील द्विपक्षीय संबंधांना सर्वोच्च पातळीवर घेऊन जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारत भेटीवर आलेल्या अध्यक्ष डॉ मोहमद मुइझ्झु यांचे सन्मानार्थ महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मंगळवारी (दि. ८ ऑक्टो) राजभवन मुंबई येथे एका स्वागत समारंभाचे आयोजन केले होते त्यावेळी ते बोलत होते. मालदीव राष्ट्रपतींसोबत त्यांच्या पत्नी साजिधा मोहम्मद आणि उच्चस्तरीय मंत्रीस्तरीय शिष्टमंडळ होते.

आपल्या मुंबई भेटीत आपली प्रसिद्ध बॉलीवूड निर्माते व अभिनेते यांचेशी फलदायी चर्चा झाल्याची माहिती देताना मुइझ्झु यांनी बॉलिवूड निर्माते व दिग्दर्शक यांना संयुक्त चित्रपट निर्मितीसाठी तसेच चित्रीकरणासाठी मालदीवमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. मालदीवमध्ये दूरचित्रवाणी मालिकांचे चित्रीकरण करण्याच्या शक्यतेचा देखील विचार व्हावा असे त्यांनी सांगितले. मालिका व चित्रपटांमुळे मालदीवमधील पर्यटनाला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.

मालदीव आणि भारत पुढील वर्षी राजनैतिक संबंधांची ६० वर्षे साजरी करत आहेत असे सांगून राष्ट्रपती मुइझू यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या यशस्वी भेटीबद्दल समाधान व्यक्त केले.

मालदीवच्या राष्ट्रपतींचे महाराष्ट्रात स्वागत करताना राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले की, नवी दिल्लीत स्वीकारण्यात आलेले व्हिजन डॉक्युमेंट उभय पक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

मालदीवमध्ये रुपे कार्ड सुरु केल्यामुळे मालदीवला भेट देणाऱ्या भारतीयांना मदत होईल आणि त्यातून पर्यटनाच्या वाढीला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.

मालदीव हा हिंदी महासागर क्षेत्रात भारताचा प्रमुख भागीदार आहे आणि एक घनिष्ट मित्र आहे. भारत आणि मालदीव मध्ये अनेक शतकांपासून सांस्कृतिक, आर्थिक व व्यापार संबंध आहेत. भारताचे ‘शेजारी प्रथम’ धोरण आणि ‘सागर व्हिजन’ मध्ये मालदीवला विशेष स्थान असल्याचे राज्यपालांनी अध्यक्ष मुइझ्झू यांना सांगितले.

भारत आता मालदीवच्या प्रमुख व्यापार भागीदारांपैकी एक झाला आहे याबद्दल आनंद व्यक्त करून राज्यपालांनी भारतीय व्यावसायिकांना मालदीवशी सहकार्य वाढविण्यात रुची असल्याचे सांगितले.

भारतीय डॉक्टर, परिचारिका आणि पॅरामेडिक्स संपूर्ण मालदीवमध्ये काम करत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून भारतीय शिक्षक देखील मालदीव मध्ये सेवा देत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

औपचारिक भेटीनंतर राज्यपालांनी मालदीवचे राष्ट्रपती आणि त्यांच्या मंत्रीस्तरीय शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ प्रीती भोजनाचे आयोजन केले.

यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पश्चिम नौदल मुख्यालयाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल अजय कोचर, भारतीय तटरक्षक दलाचे महानिरीक्षक भीष्म शर्मा आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रावण अमर हैं...!

Wed Oct 9 , 2024
एक व्यंग्य आपके अवलोकनार्थ…प्रतिक्रिया की अपेक्षा….पसंद आए तो आगे भेजते चले इसे आप प्रकाशित भी कर सकते है। समाज में रावण दर्शन हर दिन नए नए रूप में हो रहे है। कभी बेटियों पर अत्याचार, कभी समाज में भ्रम फैलाते दिखते है…तो कभी जाति भेद का जहर उगलते दिखाई देते है। ऐसे ही कई रूपों में रावण के दर्शन हो […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!