– वेबिनारद्वारे प्रधानमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी साधला संवाद
– पिक कर्ज व्याज सवलत योजना आता ५ लाखापर्यंत
यवतमाळ :- केंद्र सरकारद्वारा नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या राष्ट्रीय बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या पिक कर्ज व ईतर विषयावरील तरतुदींची माहितीसाठी केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाच्यावतीने ‘कृषि आणी ग्रामीण समृद्धी’ याविषयावर वेबिनार आयोजित करण्यात आला होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वेबिनारद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधला.
वेबिनारला जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वेबिनारला उद्देशून शेतकऱ्यांशी सवांद साधला. त्यांनी शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. देशातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकटीकरणासाठी संस्थात्मक पतपुरवठाचे महत्व सांगितले.
भारत सरकारद्वारे २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून पात्र केसीसी धारकांना कर्ज व्याज सवलत योजना वाढीव मर्यादा ३ लाखावरून ५ लाख करण्यात आलेली आहे. या योजनेमुळे लहान व मध्यम शेतकऱ्यांवरील वित्तीय ताण कमी होण्यास मदत होईल. ही योजना पिक कर्ज, फलोत्पादन, पशुसंवर्धन तसेच मत्स्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लागू आहे. तसेच भारतीय रिजर्व बँकेद्वारा शेती कर्जासाठी बिना तारण कर्ज मर्यादा १ लाख ६० हजारावरुन २ लाखापर्यंत करण्यात आलेली आहे.
वेबिनारला जिल्हा अग्रणी प्रबंधक अमर गजभिये यांनी उपस्थित सर्व शेतकरी बांधव व ईतर शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रविण दुधे, निशिकांत ठाकरे, योगेश निलखान, अविनाश महाजन, प्रसंजीत डोंगरे, मनोज राठोड व ईतर जिल्हा बँक समन्वयकयांचे सहकार्य लाभले.