जनतेच्या जीवनात परिवर्तन घडविणारे काम करू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

– राज्याची अर्थव्यवस्था जनतेला न्याय देणारी असेल

– अमृतकाळात देशाला विकसित करण्यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य पूर्ण करा

नागपूर :-  शेतकरी, कष्टकरी, आदिवासी अशा समाजातील सर्व घटकांसाठी राज्य सरकार अव्याहतपणे कार्यकरीत आहे. हेच कार्य जोमाने पुढे घेवून जावू आणि जनतेच्या जीवनात दृश्य परिवर्तन घडवू, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भारतीय स्वातंत्र्याच्या ७६व्या वर्धापनदिनाच्या उद्बोधनात व्यक्त केला.

देशाच्या अर्थव्यवस्थेत 1 ट्रीलियन डॉलरचे योगदान देण्याचा प्रण असून देश व महाराष्ट्रातील जनतेला न्याय देणारी अर्थव्यवस्था उभारण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृतकाळात देशाला विकसित करण्यासाठी दिलेले ‘पंचप्रण’ प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या अनुरुप कर्तव्य बजावावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात आज स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनाचा सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात श्री. फडणवीस बोलत होते. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त अमीतेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, विविध पुरस्कार विजेत्यांसह मान्यवर, अधिकारी -कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्य सरकार दीन-दलीत, गोर-गरिब, आदिवासी अशा समाजातील सर्व घटकांसाठी सातत्याने कार्य करीत आहे. येत्या काळातही सर्व सामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडविणारे कार्य करू. पंतप्रधानांनी देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलीय डॉलर करण्याचे स्वप्न पाहिले आहे. यात महाराष्ट्राचेही महत्वाचे योगदान असेल, राज्य यात 1 ट्रिलीयन डॉलरचे योगदान देणार आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेची घौडदौड सुरु आहे. याला पुढे घेवून जात देशातील व राज्यातील जनतेला न्याय देणारी मजबूत अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेन कार्य करू. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकाळात पंतप्रधानांनी देशाला विकसित भारत बनविण्यासाठी ‘पंचप्रण’ दिले आहे. प्रत्येक नागरिकांनी हे ‘पंचप्रण’ प्रत्यक्षात आणण्यासाठी आपले कर्तव्यपार पाडण्यासाठी प्रयत्न करावे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

गेल्या वर्षभरात राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात शासनाने 50 हजार रुपये दिले आहेत. ‘पीएम किसान’ योजनेला पूरक अशी ‘नमो शेतकरी सन्मान योजना’ राज्य शासनाने आणली असून केंद्राप्रमाणे राज्य शासनाच्यावतीनेही प्रत्येक शेतकऱ्याला 6 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना मागणी नुसार मागेल त्याला शेततळे, ड्रीप, पेरणी यंत्र देण्यात येत आहेत. नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेंतर्गत जागतिक बँकेच्या सहकार्याने पश्चिम विदर्भात पहिल्या टप्प्यात 4 हजार कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात पूर्व विदर्भात 6 हजार कोटींची कामे करण्यात येणार असून यामाध्यमातून शेतमालावर प्रक्रिया, शेतमालाची साठवणूक, शेतमालास भाव मिळवूण देण्यासाठी व्यवस्था उभारण्यात येईल. राज्यात 1 रुपयांमध्ये पंतप्रधान पीक विमा नोंदविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दीड कोटी इतकी विक्रमी झाली आहे. नागपूर जिल्हयातही प्रथमच अडीच लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यांतर्गत नोंदणी केली आहे.

समाजातील अनुसूचित जाती , जमाती, विशेष मागास प्रवर्ग, मागास आणि भटक्या विमुक्तांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रचलित सर्व आवास योजनांच्या मदतीला ओबीसींना हक्काचे घर देण्यासाठी मोदी आवास योजनेतून घरे बांधून दिली जाणार आहेत.

नागपुरचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दृष्टीने जोमाने कामे होत आहेत. 227 कोटी रुपयांच्या खर्चातून शहरात ‘ॲग्री कन्व्हेंशन सेंटर’ उभारण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गामुळे विदर्भ व नागपूरचा विकास साधला जात आहे. नागपूर शहरात जवळपास 1 हजार एकरावर अत्याधुनिक सुविधा युक्त ‘लॉजिस्टीक पार्क’ उभारण्यात येणार असल्याचे श्री.फडणवीस यांनी सांगितले. शहराची आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी आणि गोरगरिबांना उत्तम आरोग्य सेवा पुरविण्यासाठी कार्य सुरु आहे. याअंतर्गत 76 वर्ष जुन्या नागपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे उन्नतीकरण करण्यासाठी 525 कोटींचा निधी देण्यात आला आहे. यातील 172 कोटींच्या कामांचे भूमीपूजन पार पडले असून लवकरच 142 कोटींच्या कामांचीही सुरुवात होणार आहे. मेयो रुग्णालयातील सेवा अधिक बळकट करण्यासाठी 350 कोटींच्या कामांना सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सिकलसेलच्या उच्चाटनासाठी पंतप्रधान मोदी यांच्या दूरदृष्टीतून महत्वाचा कार्यक्रम देशभर राबविला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत 1 लाख रुग्णांचे स्क्रीनिंग करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले

नळगंगा आणि वैनगंगा प्रकल्प सद्या मंजुरीच्या शेवटच्या टप्पात असून या प्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भातील दुष्काळी भागासह सर्व जिल्हे जलयुक्त करण्यात येणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात स्टील उद्योगाद्वारे 20 हजार कोटींची गुंतवणूक आली आहे. येत्या काळातही याच उद्योगात 1 लाख कोटींची गुंतवणूक होणार असल्याचे सकारात्मक चित्र असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने पंतप्रधानांच्या संकल्पनेतून गेल्या वर्षीपासून स्वातंत्र्य दिनी ‘हर घर तिरंगा अभियान’ राबविण्यात येत आहे. मोठया प्रमाणात सहभागी होवून देशवासियांनी हे अभियान यशस्वी केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोपानिमित्ताने पंतप्रधानांच्या दूरदृष्टीतून ‘मेरा माटी मेरा देश अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत देशभरातील माती दिल्ली येथे पोचेल आणि शहिदांच्या स्मृतीप्रित्यर्थ्य येथे ‘स्मृतीवन’ तयार होणार आहे. या अभियानांतर्गत पंचप्रण प्रतिज्ञा देण्यात येत आहे. पंचप्रण प्रत्यक्षात आणण्यासाठी देशातील सर्व नागरिकांनी आपले कर्तव्य बजावत योगदान देण्याचे आवाहनही फडणवीस यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

त्रिसूत्री अवलंबून लोकाभिमुख सुविधांवर भर देणार - स्वातंत्र्यदिनी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांचा संकल्प

Tue Aug 15 , 2023
नागपूर :- नागपूर शहरामध्ये उत्कृष्ट पायाभूत सुविधा निर्माण करणे, मनपाच्या सुविधांमध्ये अधिक सुलभता प्रदान करणे आणि नागरिकांचे जीवनमान उंचावणे या त्रिसूत्रीचा अवलंब करून नागपूर शहरातील लोकाभिमुख सुविधांवर भर देणार, असा संकल्प मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला. मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने ध्वजारोहणानंतर मनपा मुख्यालयातील हिरवळीवर आयोजित समारंभात ते बोलत होते. मंचावर अतिरिक्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!