नागपूर :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत नागपूरची मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचा एक भाग म्हणून शुक्रवारी (ता: 8) युवकांच्या मनात आपल्या राष्ट्रीय कर्तव्या प्रती जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने स्वीप अंतर्गत मतदार संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थी मतदारांनी “आम्ही करणार मतदान” असा निर्धार केला.
सदर येथील जी.एच. रायसोनी महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित मतदार संवाद कार्यक्रमात नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, मनपाचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर,जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षां गौरकर, मनपाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, मंगळवारी झोनचे अधीक्षक अजय परसटवार, जी.एच. रायसोनी महाविद्यालयाच्या संचालिका आरती देशपांडे, अरुमिता पावा, महाविद्यालयाच्या अधिष्ठाता माधुरी बर्वा, प्राध्यापक मोहनीश हूड, मनपाचे पुरुषोत्तम कमळकर, प्रवीण तंत्रपाळे, प्रवीण भाटी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
विद्यार्थी मतदारांना मार्गदर्शन करीत नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी मतदान का करावे याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, देशाच्या विकासात युवकांचा महत्त्वाचा वाटा आहे. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे आपल्या शहराला मतदानात पुढे नेत डिस्टिंक्शन मिळवून देण्याचा युवकांनी प्रयत्न करायला हवा. युवकांनी वोटर हेल्पलाइन ॲप ची माहिती जाणून घेत इतरांना देखील याबाबत जागृत करायला हवे. तसेच मी मतदान करणार या सोबतच कुटुंब मित्रमंडळी अशा पाच मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करीन असा निर्धार करावा असे आवाहनही महामुनी यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत मनपाचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांनी स्वीप बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थ्यांनी स्वतः मतदान करावेच तसेच घरातील सर्वांना मतदानासाठी प्रेरित करावे असे आवाहन चारठाणकर यांनी केले. तर प्रशासनाच्या वतीने मतदान जनजागृती साठी आयोजित विविध स्पर्धेची माहिती जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षां गौरकर यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम कमळकर यांनी तर आभार जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी व्यक्त केले.