चंद्रपुर- शहर महानगरपालिकेमार्फत केंद्र शासन पुरस्कृत अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन ॲण्ड अर्बन ट्रान्सफॉरमेशन (अमृत) पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. वृंदावन नगर, राष्ट्रवादी नगर, तुळसिनगर परिसरातील अमृत झोन 16 मधील अमृत पाणीपुवठा योजनेचे काम पूर्ण झाले असून, लोकार्पण सोहळा गुरुवार, ता. 17 फेब्रुवारी रोजी माजी वन व अर्थ मंत्री तथा लोक लेखा समिती अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडले.
शीतला माता मंदिर येथे आयोजित कार्यक्रमाला महापौर राखी संजय कंचर्लावार, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष डॉक्टर मंगेश गुलवाडे, भाजपचे कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, नगरसेवक सुभाष कासनगोटूवार, नगरसेविका शीलाताई चव्हाण, नगरसेविका माया उईके यांची उपस्थिती होती. 

यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले राष्ट्रवादी नगर वृंदावन नगर हा परिसर दुर्लक्षित होता. तेथे रस्ते, पाणी, नाल्या आदींची समस्या होती. महानगरपालिकेने जातीने लक्ष देऊन अमृत योजना सुरु केली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या भागात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर च्या भरोशावर राहावे लागत होते. मात्र आता अमृत पाणीपुरवठा योजनेतील पिण्याचे पाणी घरापर्यंत पोहोचल्याने नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे.
दरम्यान या भागातील शीतला माता मंदिर येथे प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शीतला मातेचे दर्शन घेऊन पूजा केली.