– शंभर टक्के मतदानाची घेतली शपथ
नागपूर :- विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी संपूर्ण नागपूर शहरात राबविण्यात येत असलेल्या जनजागृती अभियानाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. बुधवारी (ता.१३) गीतांजली टॉकीज चौक परिसरामध्ये शहरातील तृतीयपंथीयांनी मतदान जनजागृती केली.
‘मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग’ अर्थात स्वीप कार्यक्रम अंतर्गत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार नागपूर शहरामध्ये शंभर टक्के मतदान व्हावे याकरिता मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये तृतीयपंथीयांनी सहभाग नोंदविला. बुधवारी (ता.१३) हंसापुरी गीतांजली टॉकीज चौक परिसरामध्ये मतदार जनजागृती करणारे फलक हातात घेऊन तृतीयपंथीयांनी मतदानाचा जागर केला. यावेळी मनपाचे गांधीबाग झोनचे झोनल अधिकारी सुरेश खरे, लोकन्यायालयाच्या न्यायाधीश विद्या कांबळे, तृतीयपंथी राखी, मुस्कान, विद्या यांच्यासह अनेक तृतीयपंथी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्वांनी शंभर टक्के मतदानासाठी पुढाकार घेण्याची शपथ घेतली. मतदान आपला अधिकार असून प्रत्येकाने मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. भारतीय संविधानाने लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येक व्यक्तीच्या मताला सारखे महत्व दिले आहे. त्यामुळे लोकशाहीत प्रत्येक मत अमूल्य असून प्रत्येकाने सशक्त लोकशाहीसाठी मतदान नक्की करावे, असे आवाहन यावेळी तृतीयपंथी समुदायाकडून करण्यात आले.