– नागपूरकरांच्या निर्धाराने मतदानाचे लक्ष्य प्राप्त होणार : डॉ. रवींद्रकुमार सिंगल
नागपूर :- ‘नागपूरकर वोट कर…’ असा संदेश देत नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी ‘बाईक रॅली’मधून नागपूर शहरातील जनतेला मतदानाचा संदेश दिला. या रॅलीमध्ये सहभागी होऊन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, निवडणूक निरीक्षक सुनीलकुमार सिंग, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी सहभागींचा उत्साह वाढविला. नागपूरकरांच्या मतदानाच्या निर्धारामुळे यावेळी ७५टक्के मतदानाचे लक्ष्य नक्की प्राप्त होणार, असा विश्वास पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी व्यक्त केला.
मतदार जनजागृतीसाठी रविवारी (ता.१७) नागपूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त पुढाकाराने ‘बाईक रॅली’ काढण्यात आली होती. मनपा मुख्यालयातून रॅलीला सुरूवात झाली. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, निवडणूक निरीक्षक सुनीलकुमार सिंग, भोर सिंग, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवली व स्वत: देखील रॅलीमध्ये सहभाग नोंदविला.
मनपा मुख्यालयामधून सुरू झालेली रॅली व्हीसीए चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, आकाशवाणी चौक, जी.पी.ओ. चौक, जिल्हा परिषद कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय, लेडिज क्लब चौक, जी.एस. कॉलेज चौक, शंकरनगर चौक, झाशी राणी चौक, लोहापुल नवीन अंडर पास, मोक्षधाम चौक, जाटतरोडी (रामबाग), मेडिकल चौक, क्रीडा चौक, सोमवारी कॉर्टर, सक्करदरा चौक, मंगलमूर्ती लॉन चौक, जगनाडे चौक, गंगाबाई घाट चौक, टेलिफोन एक्सचेंज चौक, सी.ए. रोड, मेयो हॉस्पिटल चौक, कडबी चौक पूल, छावणी, सदर या मार्गाने मनपा मुख्यायामध्ये परत आली व रॅलीचे समापन झाले. यानंतर मनपा मुख्यालयातील हिरवळीवर सर्व सहभागींना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी मतदानाची शपथ दिली.
यावेळी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी ‘बॉईक रॅली’मध्ये सहभागी सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. असाच उत्साह मतदानासाठी कायम ठेवून इतरांनाही त्यासाठी प्रेरीत करावे. येत्या २० नोव्हेंबर रोजी अशाच उत्साहाने मतदान करून नागपूर शहरातील मतदानाची टक्केवारी वाढवावी, असे अवाहन देखील त्यांनी केले.
नागपूर जिल्हा निवडणूक निरीक्षक सुनील कुमार यांनी रॅलीमध्ये सहभागी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. नागपूर शहराच्या मतदानाची टक्केवारी ७५ टक्क्यांच्या वर वाढविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या कुटुंबातील व्यक्तीसह नातलग, शेजारी या सर्वांना मतदानासाठी प्रेरीत करावे, असे आवाहन त्यांनी केले.
‘बाईक रॅली’मध्ये नागपूर महानगरपालिका उपायुक्त विजय देशमुख, परिवहन व्यवस्थापक विकास जाधव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, सहायक आयुक्त सर्वश्री श्याम कापसे, हरीश राऊत, प्रमोद वानखेडे, घनश्याम पंधरे, अशोक घारोटे, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर, राजकुमार मेश्राम यांच्यासह जिल्हा परिषदेचे कर्मचारी तसेच ऑरेंज सिटी रायडर्स क्लब, ह्युमॅनिटी सोशल फाऊंडेशनच्या पूजा मानमोडे आणि चमू या सर्वांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. मनपाच्या महिला कर्मचाऱ्यांनी नऊवारी साडी आणि पारंपरिक वेषभूषा करून ‘बॉईक रॅली’मध्ये सहभागी होऊन ‘नागपूरकर वोट कर…’चे फलक दाखवून जनजागृती केली.
मनपा मुख्यालयातील रॅलीच्या समापन कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले व शेवटी त्यांनी आभारही मानले.