– जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कार्यालय प्रांगणात महाश्रमदान
यवतमाळ :- स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा, हे अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामस्थाने या मोहिमेत सहभागी होऊन आपआपले गाव स्वच्छ करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी केले.
अभियानांतर्गत जिल्हा परिषद प्रांगणात महाश्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. स्वच्छता ही सेवा हे अभियान जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये दि.17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबविण्यात येऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जंयतीचे औचित्य साधून दि.2 ऑक्टोंबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे.
या मोहिमेच्या माध्यमातून गावे स्वच्छ व्हावी, गावात स्वच्छतेची लोकचळवळ निर्माण होण्याकरीता स्वच्छतेचे उपक्रम गावस्तरावर राबविणे सुरु आहे. त्याअनुषंगाने शुक्रवारी जिल्हा परिषद कार्यालयातील प्रांगणात मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्या उपस्थितीमध्ये महाश्रमदान राबविण्यात आले. या श्रमदानात जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ग्रामपंचायत विभाग, महिला व बालकल्याण विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, समाजकल्याण विभाग, बांधकाम विभाग, पाणी व स्वच्छता विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, सिंचन विभाग या सर्व विभागाचे खाते प्रमुख व कर्मचारी सहभागी झाले होते.
जिल्हा परिषदेमध्ये नियमित सफाई करणारे कर्मचारी तसेच सावित्री ज्योतीराव समाजकार्य महाविद्यालयातील स्वच्छता विभागाकडे प्लेसमेंटसाठी असलेले विद्यार्थी सुध्दा या महाश्रमदनामध्ये सहभागी झाले होते. यावेळी देवीदास ढगे या कर्मचाऱ्याने संत गाडगेबाबा आणि गजानन जडेकर या कलावंताने महात्मा गांधी यांची वेशभूषा करून श्रमदानामध्ये सहभाग घेतला. कार्यालयाचा परिसर स्वच्छ असल्यास कर्मचारी अधिक उत्साहाने काम करू शकतात, असे उद्गार मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी यावेळी काढले.
या मोहिमेंतर्गत एक झाड आईच्या नावे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी जिल्हा परिषदेच्या सायकल स्टॅण्डमध्ये आपल्या आईच्या नावे एक झाड लावले. यावेळी जिल्हा प्रकल्प संचालक, पाणी व स्वच्छता प्रकाश नाटकर आणि सर्व विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वच्छ भारत मिशनच्या सर्व सल्लागारांनी परिश्रम घेतले.