मुंबई :- अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाअंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्रातील समस्त शिंपी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सोमवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
अहिर शिंपी समाजाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष विजय नाना बिरारी, भावसार शिंपी समाजाचे अध्यक्ष महेंद्र पतंगे यांच्यासह शिंपी समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात बावनकुळे यांनी या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील हेही यावेळी उपस्थित होते. पक्ष प्रवेशाची भूमिका मनोज भांडारकर यांनी विषद केली. तसेच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना समाजाचे नेते व अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी लवकरच भेट घेऊन मागण्यांबाबत चर्चा करू, असे आश्वासन प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिले.
अॅड. मीना केशव सोनोने, जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मयूर शिंपी, पुणे येथील मयूर हिरवे, जळगाव येथील अशोक शिंपी, सोलापूर येथील सिद्धार्थ बकरे, सोलापूर येथील मंगेश ढवळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.