नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील विदर्भस्तरीय खो-खो स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत प्रतिस्पर्धींना मात देत विदर्भ युथ क्रीडा मंडळ काटोल आणि नव जयहिंद क्रीडा मंडळ यवतमाळ संघाने पुरुष व महिला गटात विजेतेपद पटकाविले. मानकापूर क्रीडा संकुल येथे ही स्पर्धा पार पडली.
पुरुष गटात विदर्भ युथ क्रीडा मंडळ काटोल संघाने विदर्भ क्रीडा मंडळ काटोल संघाचा पराभव करुन विजेतेपदावर नाव कोरले. स्पर्धेत नव महाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर तिस-या स्थानी राहिले. महिला गटात नव जयहिंद क्रीडा मंडळ यवतमाळ संघाने अनंत क्रीडा मंडळ अकोला संघाला नमवून जेतेपद पटकाविले. मराठा फ्रेन्ड्स क्लब अमरावती संघ तिस-या स्थानी राहिले. दोन्ही गटात प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी ३५ हजार रुपये रोख व सुवर्ण पदक, उपविजेत्यांना प्रत्येकी ३० हजार रोख व रौप्य पदक आणि तिस-या स्थानावरील चमूंना प्रत्येकी २५ हजार रुपये रोख व कांस्य पदक प्रदान करण्यात आले.
सबज्यूनिअर मुलांमध्ये महाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर संघाने श्रीराम क्रीडा मंडळ मुसेवाडी संघाला नमवून विजेतेपद पटकाविले. तिस-या स्थानी विदर्भ युथ लाडगाव संघ राहिला. मुलींमध्ये विदर्भ युथ लाडगाव संघाने छत्रपती युवक प्रसारक मंडळ नागपूर संघाला मात देउन जेतेपदावर मोहोर उमटविली. श्रीराम क्रीडा मंडळ मुसेवाडी संघाने तिसरे स्थान प्राप्त केले. दोन्ही गटात प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी २१ हजार रुपये रोख व सुवर्ण पदक, उपविजेत्यांना प्रत्येकी १५ हजार रुपये रोख व रौप्य पदक आणि तिस-या स्थानावरील चमूंना प्रत्येकी ११ हजार रुपये रोख व कांस्य पदक प्रदान करण्यात आले. चवथ्या क्रमांकाच्या चमूंना प्रत्येकी ५ हजार रुपये पुरस्कार प्रदान करण्यात आले.
विजेत्यांना नागपूर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी नागपूर जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष अनूप खरडे, नागपूर शहर भाजपा अध्यक्ष बंटी कुकडे उपस्थित होते. प्रास्ताविक खासदार क्रीडा महोत्सवाचे को-कन्वेनर डॉ.पद्माकर चारमोडे यांनी केले तर संचालन वैभव कुमरे यांनी केले.