– कुलगुरूंच्या रूपाने अमरावती विद्यापीठाचा बहुमान
– कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव
अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची भारतीय विश्वविद्यालय संघ, नवी दिल्लीच्या आस्थापना समितीवर एकवर्ष कालावधीकरीता सदस्य म्हणून निवड झाली आहे. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची अखिल भारतीय स्तरावर निवड झाल्याबद्दल त्यांचे सार्वत्रिक अभिनंदन करण्यात येत आहे. ही निवड 1 जुलै, 2023 ते 30 जून, 2024 या कालावधीसाठी असणार आहे. या संदर्भात भारतीय विश्वविद्यालय संघाच्या महासचिव डॉ. पंकज मित्तल यांचे विद्यापीठाला नुकतेच पत्र प्राप्त झाले असून त्या पत्रामध्ये आपल्या अनुभवाचा, कार्याचा तसेच मार्गदर्शनाचा लाभ विश्वविद्यालय संघाला होईल, असे नमूद करुन सदस्यपद स्वीकारावे, असे त्यात म्हटले आहे.
पाच विद्यापीठांचे कुलगुरू म्हणून कार्य करण्याचा अनुभव
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचेकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक, वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ, परभणी आणि संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती या पाच विद्यापीठांचे कुलगुरू म्हणून पदभार सांभाळण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. बहुधा महाराष्ट्रामध्ये ते एकमेव असावेत. त्यांनी फार्मसी काऊन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्षपद यापूर्वी भूषविले असून महात्मा गांधी हिंदी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे राष्ट्रपती नामित सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर विद्यापीठामध्ये अनेक विद्यार्थीहितार्थ योजना राबविल्यात. शैक्षणिक विकासामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाचे कार्य अग्रेसर आहे. नुकताच झालेल्या दीक्षांत समारंभाचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्टरितीने आयोजन करण्यात आले. याशिवाय विद्यापीठाच्या सर्व परीक्षांचे निकाल वेळेवर लागले आहेत व लागत आहे, याकरीता कुलगुरू डॉ. येवले यांचे बहुमूल्य मार्गदर्शन व नेतृत्व यशस्वी ठरत आहे. कुशल शैक्षणिक व प्रशासकीय नेतृत्व लाभलेल्या डॉ. येवले यांनी बोर्ड ऑफ स्टडीजचे नामनिर्देशन लवकरात लवकर करुन विद्वत परिषदेचे गठण केले आहे. त्यांच्या अनुभवाचा व ज्ञानाचा लाभ निश्चितच भारतीय विश्वविद्यालय संघाला होणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, व्यवस्थापन परिषद सदस्य, विविध प्राधिकारिणींचे सदस्य, विद्यापीठ शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, शिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.