– पाणी, औषधे, प्रथमोपचाराची सुविधा
– उन्हापासून बचावासाठी केंद्रांवर शेड
यवतमाळ :- येत्या दिनांक २६ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदान व्हावे यासाठी प्रशासनाच्यावतीने सातत्याने जनजागृती करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर मतदारांच्या सोईसाठी विविध सोईसुविधा उपलब्ध देण्यात येत आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने निवडणुकीच्या या उत्सवात जिल्ह्याची मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शालेय विद्यार्थी, शिक्षक, सामान्य नागरिक, विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्याने सातत्याने मतदान जनजागृती करण्यात आली. त्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित करणे हा या मागचा उद्देश आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचे प्रमाण वाढवायचे असून आपण किमान ७५ टक्के मतदान होईल, यापद्धतीने प्रयत्न करतो आहे.
सद्या तापमान वाढले आहे. त्यामुळे मतदानासाठी केंद्रावर येणाऱ्या मतदारांना उन्हात उभे रहावे लागू नये यासाठी जेथे आवश्यकता आहे तेथे शेड उभारण्यात येत आहे. एकावेळी जास्त मतदारांना रांगेत उभे रहावे लागणार नाही, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. जास्त गर्दी झाल्यास मतदारांना बाजूच्या कक्षास बसण्याची व्यवस्था केली जातील. उन्हाळ्याचे दिवस असल्याने मतदार तसेच निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी मुबलक पिण्याचे पाणी तसेच स्वच्छतागृहे केंद्रावर उपलब्ध राहणार आहे.
व्हिल चेअर, औषधे, डॉक्टर, अँम्बूलन्स
वाढत्या तापमानामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्यास तातडीने उपचार करता यावे यासाठी केंद्रावर औषधे, प्रथमोपचार उपलब्ध राहतील. ठराविक ठिकाणी डॉक्टर व अँम्बुलन्स देखील तयार असणार आहे. दिव्यांग मतदारांसाठी प्रत्येक केंद्रावर व्हिल चेअर उपलब्ध राहणार आहे तसेच अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीत डमी बँलेट पेपर, व्होटर स्लिप राहणार आहे.
मतदारांना व्होटर स्लिपचे वाटप
मतदान करतांना मतदारांना अडचण होऊ नये, त्यांना आपले मतदान केंद्र, मतदार यादीतील अनुक्रमांक, भाग क्रमांक सहज उपलब्ध व्हावा यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत मतदान पत्रिका (व्होटर स्लिप) घरोघरी वाटप करण्यात आल्या आहे. काही ठिकाणी वाटप सुरु आहे.
शहरी मतदान केंद्र गुगल मँपवर
शहरी भागातील मतदारांना मतदान केंद्र शोधतांना अडचन जावू नये, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या सूचनेप्रमाणे या भागातील मतदान केंद्र गुगल मँपवर टाकण्यात आले आहे. मतदान केंद्राचा पत्ता मँपवर सर्च केल्यास आपले केंद्र काही सेकंदात मतदारांना शोधता येईल.
प्रत्येक केंद्रावर मतदार सहायता कक्ष
जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी मतदान सहायता कक्ष स्थापन केला जाणार आहे. ज्या मतदारांना व्होटर स्लिप प्राप्त झाल्या नसतील, त्याना या केंद्रात त्या उपलब्ध होतील. शिवाय मतदारांना आवश्यक सहाय्य केंद्रात उपलब्ध मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडून उपलब्ध होऊ शकेल.
तेथे अतिरिक्त मनुष्यबळ, स्वयंसेवक
जिल्ह्यातील ज्या मतदान केंद्रावर १ हजार २०० पेक्षा अधिक मतदार आहेत, अशा केंद्रावर अतिरिक्त मनुष्यबळ राहणार आहे. या केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांतपणे पार पाडण्यासाठी स्वयंसेवक देखील नेमण्यात येणार आहे.