नागपूर, ता. ११ : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात ७५ वंदे मातरम् नागरी आरोग्य सुविधा केंद्र तयार करण्यात येत आहेत. याच श्रृंखलेमध्ये हनुमान नगर झोन अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन सोमवारी पेठ येथील वंदे मातरम् नागरी आरोग्य सुविधा केंद्राचे शुक्रवारी (ता.११) महापौर दयाशंकर तिवारी यांनी लोकार्पण केले.
यावेळी ज्येष्ठ नगरसेवक सतीश होले, ज्येष्ठ नगरसेवक डॉ.रवींद्र (छोटू) भोयर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, देवेन दस्तुरे, सार्थक बहुद्देशिय संस्थेचे डॉ. फरकासे, डॉ. ओझा आदी उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन सोमवारी पेठ येथील वंदे मातरम् नागरी आरोग्य सुविधा केंद्र भारतीय सेनेतील महावीर चक्र प्रदान बलराम सिंग यांना समर्पित करण्यात आले आहे. या केंद्राच्या संचालनाची जबाबदारी सार्थक बहुद्देशिय संस्थेला देण्यात आली आहे.
यावेळी बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, नागपूर शहरातील गोरगरीब जनतेला त्यांच्या वस्तीमध्ये, परिसरात प्राथमिक आरोग्य सुविधा सहजरित्या उपलब्ध व्हावी यादृष्टीने वंदे मातरम् नागरी आरोग्य सुविधा केंद्राची संकल्पना पुढे आली. नागपूर शहरातील विविध भागांमध्ये ७५ केंद्र साकारण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी पेठ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथील केंद्र नागरीकांच्या सुविधेसाठी सुरू झाल्याचा आनंद आहे. आरोग्य केंद्राच्या माध्यमातून परिसरातील गरजूंना नियमित आरोग्य सुविधा मिळण्यास याचा मोठा फायदा होणार आहे. देशासाठी आपले बहुमूल्य योगदान देणारे महावीर चक्र प्राप्त बलराम सिंग यांच्या स्मृती जीवंत ठेवण्यासाठी हे वंदे मातरम् नागरी आरोग्य सुविधा केंद्र नेहमी कार्य करेल, असा विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथील वंदे मातरम् नागरी आरोग्य केंद्राच्या संचालनाची जबाबदारी स्वीकारणा-या सार्थक बहुद्देशिय संस्थेचे डॉ. फरकासे, डॉ.ओझा यांच्यासह संपूर्ण चमूचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी अभिनंदन करीत जनसेवेच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.