लेखा व कोषागारे दिन साजरा
नागपूर : लेखा व कोषागारे विभागाचा संबंध शासनाच्या प्रत्येक कार्यालयाशी येतो तसेच या विभागाचे अधिकारी शासनाच्या प्रत्येक विभागात कार्यरत आहेत. त्यामुळे लेखा विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यस्थानी उत्कृष्ट सेवा देवून आपल्या विभागाची गरिमा अधिक उंचवावी, असे मत लेखा व कोषागारे विभागाच्या सहसंचालक सुवर्णा पांडे यांनी व्यक्त केले.
जिल्हा कोषागार येथे आज लेखा व कोषागारे दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी स्थानिक निधी लेखा च्या सहसंचालक मोना ठाकूर, वरिष्ठ कोषागार अधिकारी प्रशांत गोसेवाडे, तसेच लेखा विभागाचे निवृत्त सहसंचालक अरविंद हेमके व विजय कोल्हे प्रामुख्याने उपस्थित होते.
सुवर्णा पांडे यांनी पुढे बोलतांना लेखा व कोषागारे विभागाच्या राज्यस्तरीय क्रिडास्पर्धेत यश संपादन करणाऱ्या नागपूर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले व सर्वांना लेखा व कोषागारे दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
वरिष्ठ कोषागार अधिकारी गोसेवाडे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून लेखा व कोषागारे विभागाची माहिती दिली. 1 जानेवारी 1962 रोजी लेखा व कोषागारे संचालनालय स्थापन झाला तर 1 फेब्रुवारी 1965 रोजी महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेची स्थापना करण्यात आली. 1 फेब्रुवारी 2004 पासून लेखा व कोषागारे दिन साजरा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लेखा विभागामार्फत तत्पर सेवेसाठी बिम्स, सेवार्थ, अर्थवाहीनी, वेतनीका, बील पोर्टल, ग्रास प्रणाली अशा विविध 13 सेवांचे संगणीकरण करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी लेखा व कोषागारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सामुहिक गीत गायन तसेच नृत्य सादर केले. तसेच लेखा विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
याप्रसंगी लेखा विभागाचे सर्वश्री हिरूळकर, राऊत, बोकडे, फिस्के, दाभाडे, सुखदेवे, गोसावी, अमोल परमार्थ, देशमुख, चिंचोळकर, भोयर तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.