नागपूर :- देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकार संघटनेचे विदर्भ विभागीय अधिवेशन १६ एप्रिल २०२३ रोजी नागपुरातील किंग्ज वे ऑडिटोरियम (परवाना भवन) येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनानिमित्त एका विशेष लोगोचे अनावरण राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या हस्ते चंद्रपुरात करण्यात आले.
यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, सामाजिक उपक्रम समितीचे प्रमुख तथा नागपूर जिल्हाध्यक्ष आनंद आंबेकर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संजय पडोळे, चंद्रपूर शहर कार्याध्यक्ष जितेंद्र चोरडिया, जिल्हा कार्याध्यक्ष गुरुदास गुरुनुले, स्वप्नील दुधलकर उपस्थित होते.
कुठलीतरी संघटना पत्रकारांच्या हितासाठी कार्य करते आहे ही बाब दिलासादायक आहे. व्हॉईस ऑफ मीडियानं अल्पावधीत देशभरात उभारलेले संघटन निश्चितच दखल घेण्याजोगे आहे, असे गौरवोदगार काढत अहीर यांनी अधिवेशनाला शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्राच्या उपराजधानीत होणाऱ्या विदर्भ विभागाच्या अधिवेशनात जवळपास विदर्भातील ७०० पत्रकार उपस्थित राहणार असून, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या पदाधिकाऱ्यांकडून या अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू आहे. या पत्रकार संघटनेची विदर्भातील ११ ही जिल्ह्यात संघटन बांधणी पूर्ण झाली असून, प्रत्येक तालुकास्तरावरही कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात प्रत्येक जिल्ह्यात कौटुंबिक स्नेहमिलन सेाहळ्यांचे आयोजन केले जात असून, काही जिल्ह्यात या सोहळ्यांचे उत्तमरित्या आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यात संघटनेच्या सदस्यांना १० लाखांचे विमा कवच देण्यात आले असून, अवघ्या दोन वर्षांत कृतीशिल कार्यक्रमांच्या माध्यमातून या संघटनेने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पत्रकारिता आणि पत्रकारांचे कल्याण अशी महत्वपूर्ण भुमिका घेत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल गतीने सुरू झाली आहे. पत्रकारांचे आरोग्य, पत्रकारांचे घर, पत्रकारांच्या मुलांचे शिक्षण यासह इतर प्रश्नांवर थेट कृतीशिल कार्यक्रम राबविले जात आहे. नागपुरातील विदर्भ विभागीय अधिवेशनाच्या निमित्ताने विदर्भातील सर्वच पदाधिकारी जोमाने तयारीला लागले असून, या अधिवेशनात संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्यासह राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय आवटे उपस्थित राहणार आहे. त्यांच्यासोबतच ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या विविध विंगचे प्रमुख, सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहे.