– डॉ. राजेंद्र डोळके यांच्या ‘विदर्भातील संत’ ग्रंथाचे प्रकाशन
नागपूर :- संत साहित्याने समाजावर संस्कार केले आहेत. जुन्या पिढ्यांना या साहित्यातून जीवनाचा खरा मार्ग सापडला आहे. हे संत साहित्य नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी वर्तमान पिढीवर आहे आणि आज नवीन पिढीचे माध्यम पूर्णपणे बदलले आहे. अशात संत साहित्याचे ‘डिजीटल प्रेझेंटेशन’ झाले तर ते अधिक सोयीचे ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी केले.
विदर्भ साहित्य संघाच्या वतीने डॉ. राजेंद्र गणेश डोळके यांच्या ‘विदर्भातील संत’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला. ना. गडकरी यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन झाले. विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. म. रा. जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते अध्यक्षस्थानी होते. ना. गडकरी म्हणाले, ‘डॉ. राजेंद्र डोळके यांनी अभ्यासपूर्ण माहिती एकत्रित करून एका अत्यंत महत्त्वाच्या ग्रंथाची निर्मिती केली आहे, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. विदर्भातील संतांचा परिचय आपल्याला या ग्रंथामधून होणार आहे. कुठल्याही विषयावर सखोल लिखाण करायचे असेल तर संशोधन महत्त्वाचे असते. डॉ. डोळके यांनी मांडलेल्या संशोधनातून वाचणाऱ्याला महत्त्वाचे ज्ञान मिळणार आहे. आणि ज्ञान ही वाहती गंगा आहे. त्यामुळे नवीन पिढीपर्यंत त्याचा प्रवाह पोहोचविणे आवश्यक आहे.’ यावेळी ना. गडकरी यांनी प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराजांच्या कार्याचा आवर्जून उल्लेख केला. डॉ. राजेंद्र डोळके यांनी प्रास्ताविक केले. तर संचालन डॉ. विवेक अलोणे यांनी केले.