गरीब विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरावे ‘विज्ञान केंद्र’ – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

– आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा निर्माण करण्याच्या सूचना

नागपूर :- नागपूर शहरातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागास कुटुंबांमधील विद्यार्थ्यांकरिता विज्ञानाचे भांडार खुले करणारे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधायुक्त असे विज्ञान केंद्र लवकरात लवकर निर्माण करावे, अशी सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिली. हे विज्ञान केंद्र गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ना.नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला राष्ट्रभाषा परिवारचे सुरेश अग्रवाल, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, एनआयटी सभापती संजय मीणा, शिक्षणाधिकारी आदींची उपस्थिती होती. राष्ट्रभाषा परिवारच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्व विज्ञान मेळ्याचे नियमित आयोजन केले जात आहे. या मेळ्यात बहुतांश प्रमाणात महानगरपालिकेच्या शाळांचे विद्यार्थी सहभागी होऊन प्रयोग सादर करतात. ना. गडकरी यांनी या संकल्पनेचे कौतुक करून शहरातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र मूलभूत विज्ञान केंद्र असावे, अशी संकल्पना मांडली. याच संकल्पनेवर आधारित हे केंद्र उभे होणार असून ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे असावे, असा आग्रह ना. श्री. गडकरी यांनी केला. गरोबा मैदान येथील पूर्वीच्या मनपा शाळेच्या एक एकर जागेवर नागपूर सुधार प्रन्यास हे मूलभूत विज्ञान केंद्र उभारणार आहे. याठिकाणी भारतासह जगभरातील विज्ञानाच्या संदर्भातील प्रयोगांचे प्रदर्शन असावे, चांद्रयान, मंगलयानची प्रतिकृती असावी, जेणेकरून या विद्यार्थ्यांना चित्ररुपात ज्ञान मिळेल आणि त्यांच्यामध्ये विज्ञानाबद्दल गोडी निर्माण होईल. एका छोट्या हॉलमध्ये बसून विद्यार्थी विज्ञानाचे प्रयोग करू शकतील, अशी सोय देखील करावी, असेही ना. श्री. गडकरी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. विज्ञान केंद्रासोबत ई-लायब्ररी व मिनी थिएटरचा समावेश करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. शंभर ते दोनशे आसन क्षमतेच्या मिनी थिएटरमध्ये महापुरुषांच्या जीवनावरील चित्रपट दाखविण्याची सोय करता येईल, असेही ना. गडकरी म्हणाले. संपूर्ण इमारत सौर ऊर्जेवर संचालित असावी, एक उपहारगृह असावे, अशाही सूचना त्यांनी केल्या. मूलभूत विज्ञान केंद्रासाठी जागा निश्चित करावी आणि चांगल्या आर्किटेक्चरच्या सल्ल्याने डिझाईन तयार करावे व लवकरात लवकर अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश ना. गडकरी यांनी दिले. यावेळी शहरातील विविध विकासकामांवरही चर्चा झाली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भाजप महानगर उपाध्यक्षपदी रमेश दलाल

Tue Jul 9 , 2024
नागपूर :- भारतीय जनता पार्टी महानगर उपाध्यक्ष तसेच प्रशासकीय कार्यप्रभारीपदी पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश दलाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप शहराध्यक्ष जितेंद्र कुकडे यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. भाजपमध्ये गेल्या साठ वर्षांपासून विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदार नोंदणीसह निवडणूक विषयाशी संबंधिक विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. पुढेही त्यांच्या माध्यमातून मतदार नोंदणी व निवडणूक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com