मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर इस्रायल व हमास मुद्द्यावरून चुकीची टीका केली तर सहन करणार नाही ,त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल असा खणखणीत इशारा केंद्रीय सूक्ष्म, लघु और मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना गुरुवारी दिला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रवक्ता गणेश हाके , ओमप्रकाश चौहान यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी इस्रायल- हमास संघर्षात एकंदरीत दहशतवाद विरोधी भूमिका मांडली. मात्र त्यावरून पंतप्रधान इस्रायल ला पाठिंबा देत असल्याचा चुकीचा समज पसरवण्याचा नाहक प्रयत्न पवार यांनी केल्याचे राणे यांनी नमूद केले.
राणे म्हणाले की पवार हे एकीकडे पॅलेस्टाईनची बाजू घेत आहेत आणि इस्रायलची बाजू घेतली म्हणून पंतप्रधानांवर बिनबुडाची टीका करीत आहेत. पवार यांनी केंद्रात देशात आणि राज्यात अनेक महत्वाची पदं भूषवली आहेत.चार वेळा ते मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत पवार यांनी मार्च १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटादरम्यान मशिदीमध्येही बॉम्बस्फोट झाला असे हेतुपूर्वक असत्य कथन केले होते.एका विशिष्ट समाजाच्या तुष्टीकरण साठी मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीने राजकीय हेतू ठेवून असं खोटं बोलणं हे देशहिताच्या विरोधात होते. पवार हे देश प्रथम अशी भूमिका कधी घेणार असा सवाल ही राणे यांनी केला.
केंद्र सरकारनं जुलै 1993 मध्ये नेमलेल्या एन.एन.व्होरा यांच्या समितीने दाऊद आणि मेमन टोळीचे राजकारण्यांशी असलेल्या जवळकीच्या संबंधांबाबत आपल्या अहवालात काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या नावाचा उल्लेख केला होता. व्होरा समितीच्या अहवालात दाऊदशी संबंध असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांचा उल्लेख आहे , हे पवार यांना ठाऊक हेते. मात्र त्याबाबत पवार यांनी चकार शब्द काढला नाही अशी टीका राणे यांनी केली. पवार यांनी कधीतरी चांगल्याला चांगले म्हणावे व मोदी सरकारने मागच्या ९ वर्षांत आणलेल्या ५५ योजनांचे कधीतरी कौतुक करावे असा सल्लाही राणे यांनी दिला .