नागपूर :- कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभागाच्या प्रधान सचिव, आयुक्त, उपायुक्त व सहायक आयुक्त यांच्या खोट्या स्वाक्षरीच्या आधारे बेराजगार उमेदवारांची दिशाभूल व फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भविष्यात अशा प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी बेरोजगारांनी सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र.ग. हरडे यांनी केले आहे.
नुकताच वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड, नागपूर यांच्या नावाचा गैरवापर आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभागाच्या प्रधान सचिव, आयुक्त, उपायुक्त व सहायक आयुक्त यांच्या खोट्या स्वाक्षरीच्या आधारे बेरोजगार उमेदवारांची फसवणुकीच्या प्रकरणात पोलीस स्टेशन सदर येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. काही असामाजिक तत्वांकडून अशी फसवणूक करण्यात येत आहे. याबाबत बेरोजगार उमेदवारांनी सावध राहणे गरजेचे असल्याचे विभागाकडून कळविण्यात आले आहे.