नागपूर :- जिल्ह्यातील युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत’जास्तीत-जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग आणि शासकीय, निमशासकीय आस्थापनांनी आवश्यक मनुष्यबळाची नोंदणी करावी, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी आज दिल्या.
राज्यातील युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने’ची नुकतीच घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे जिल्ह्यातील उपस्थित विविध उद्योजक, शासकीय व निमशासकीय आस्थापनांच्या प्रतिनिधींना माहिती दिली व सूचना केल्या. जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज, कौशल्य विकास अधिकारी दिग्विजय जामदार आदी यावेळी उपस्थित होते.
राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’राज्यात राबविली जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी नागपूर जिल्ह्यात करण्याच्या दृष्टीने या बैठकीत ठोंबरे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या योजनेंतर्गत रोजगार इच्छुक उमेदवारांना शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांसह उद्योग क्षेत्रातील कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार आहे. १२वी उत्तीर्ण युवकांना प्रती महिना ६ हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे. आय.टी.आय. तसेच पदविकाधारक युवकांना ८ हजार रुपये तर पदवीधर व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या युवकांना प्रती महिना १० हजार रुपये विद्यावेतन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
उद्योग, शासकीय, निमशासकीय आस्थापनांना या योजनेच्या माध्यमातून मनुष्यबळ मिळणार असून त्यांना शासनाच्यावतीने विद्या वेतन मिळणार आहे. यासाठी जिल्ह्यातील संबंधित आस्थापना व उमेदवारांना https://rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे.
तालुका स्तरावर व जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांसह उद्योग क्षेत्रातील कंपन्या आणि इच्छुक उमेदवारांची या योजनेसाठी नोंदणी होण्याच्या दिशेने संबंधित शासकीय यंत्रणांनी कार्य करावे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.
या बैठकीस हिंगणा आणि बुटीबोरी औद्योगिक संघटना, सियाट टायर, विदर्भ इंडस्ट्रियल असोसिएशन, वैभव इंटरप्राईजेस, टाटा लुपिन फार्मा बुटीबोरी आदींच्या प्रतिनिधींसह, सहसंचालक उच्च शिक्षण, सहसंचालक तंत्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र आदींचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.