– नागपूर रेल्वे स्थानकावर खळबळ
नागपूर :- मुंबई – हावडा मेलच्या कपलिंगमध्ये एक बेवारस बॅग आढळली. याप्रकारामुळे प्रचंड खळबळ उडाली. बॉम्ब शोध व नाशक पथक, श्वान पथकाने तपासणी केल्यानंतर सुटकेचा श्वास घेतला. हा प्रकार मध्यवर्ती नागपूर रेल्वेस्थानकावर गुरूवार 13 जुलैला सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी नोंद केली आहे.
अलिकडेच रेल्वे गाडीत बॉम्ब ठेवणार असल्याचा फोन लोहमार्ग पोलिसांना आला. त्यामुळे राज्यभर्यातील सर्वच रेल्वेस्थानकावर सतर्कतेचा ईशारा देण्यात आला होता. गाड्यांची कसून तपासणी झाली. त्यापृष्ठभूमीवर आता लोहमार्ग पोलिस सतर्क आहेत. नेहमी प्रमाणे मुंबई-हावडा मेल गुरूवारी सकाळी प्लॅटफार्म क्रमांक 3 वर थांबली होती. एम-1 आणि एम-2 च्या कपिलंगमध्ये एक बॅग बेवारस असल्याची सुचना बॉम्ब शोध व नाशक पथकाला मिळाली. माहिती मिळताच पथकाचे एपीआय कविकांत चौधरी, पोलिस हवालदार दीपक डोर्लिकर, राहूल गवई घटनास्थळी पोहोचले. सोबतच श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. पथकाने सावधगिरी बाळगत बॅगची तपासणी केली. मात्र, घातपात वस्तू असल्याचे निष्पन्न झाले नाही. त्यामुळे बेवारस बॅग लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी नोंद करून बॅग उघडली असता त्यात कपडे मिळाले. कदाचित चोरी करून त्यातील मौल्यवान वस्तू जवळ ठेवून बॅग फेकली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.