ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी तसेच त्यांच्या उपजीविका वाढीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, उमेदच्या अंतर्गत भंडारा जिल्ह्यात एप्रिल 2018 पासून विशेष उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या अभियानाद्वारे आजपर्यंत एकूण 14,024 महिला बचत गटांची निर्मिती करण्यात आली असून, यामध्ये 1,58,360 ग्रामीण महिलांना सहभागी करून घेण्यात आले आहे.
· सामुदायिक संस्थांची निर्मिती
महिला बचत गटांना एकत्र आणत, त्यांचे सामूहिक कार्य अधिक प्रभावी करण्यासाठी गावपातळीवर 723 ग्रामसंघांची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय, जिल्हा परिषद गण निहाय 52 प्रभाग संघांची निर्मिती झाली आहे.
· आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न
ग्रामीण भागातील महिलांच्या उपजीविकेसाठी विविध आर्थिक स्रोत निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. 2024-25 च्या वार्षिक उद्दिष्टांनुसार, 98% यश संपादन करत 142.80 कोटी रुपयांचे कर्ज महिलांना उपलब्ध करून दिले गेले आहे. या योजनेसाठी आवश्यक त्या प्रशिक्षणाद्वारे महिलांना सक्षम बनविण्यावरही भर दिला जात आहे.
· महिला शेतकरी सक्षमीकरण
महिला शेतकऱ्यांना सशक्त करण्यासाठी उमेदच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील 7 तालुक्यांमध्ये एकूण 12 महिला किसान उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत. प्रत्येक कंपनीमध्ये जवळपास 750 महिलांना सभासद म्हणून जोडण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, जिल्ह्यातील दोन महिला उत्पादक कंपन्या केंद्र शासनाच्या 10,000 शेतकरी उत्पादक कंपनी योजनेंतर्गत निवडल्या गेल्या आहेत.
· ‘लखपती दीदी’ संकल्पनेला पाठबळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “लखपती दीदी” या महत्वाकांक्षी योजनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी उमेदचा मोठा वाटा आहे. उमेदच्या साहाय्याने ग्रामीण महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
· ग्रामीण दारिद्र्य निर्मूलनासाठी प्रामाणिक प्रयत्न
ग्रामीण भागातील महिलांना केवळ आर्थिक नव्हे तर सामाजिकदृष्ट्याही सक्षम बनविण्यासाठी उमेदच्या माध्यमातून उपजीविका वाढीवर भर दिला जात आहे. या प्रयत्नांमुळे महिला आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने मोठी पावले टाकत आहेत.
भविष्यात उमेदच्या या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातील महिला नव्या उंचीवर पोहोचतील आणि त्यांच्या कुटुंबासाठी उज्ज्वल भविष्य घडेल, हीच अपेक्षा!