नागपूर :- गैरवर्तवणूक आणि गैरशिस्तीच्या कारणामुळे नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत दोन कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी मंगळवारी (ता.२३) कर्मचा-यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत.
निलेश सांबारे आणि रुपेश थुटे असे निलंबित कर्मचा-यांची नावे आहेत. निलेश सांबारे हे धंतोली झोनमध्येमध्ये उद्यान विभागात कनिष्ठ अभियंता पदावर तर रूपेश थुटे हे गांधीबाग झोनमध्ये कर संग्राहक पदावर कार्यरत आहेत. दोन्ही कर्मचा-यांवर शिस्तभंगाची कारवाई करीत त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
निलंबनाचा आदेश अंमलात असेपर्यंत निलेश सांबारे यांना मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग तर रुपेश थुटे यांना उपायुक्त (महसूल) कर विभाग मनपा प्रशासकीय इमारत येथे उपस्थित रहावे लागेल. दोन्ही कर्मचा-यांना अतिरिक्त आयुक्तांच्या पूर्वपरवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचाही आदेश निर्गमित करण्यात आला आहे.