नागपूर :-धावत्या रेल्वेत स्वयंपाकाचे गॅस सिलेंडरची वाहतूक करण्यात येत असल्याची धक्कादायक घटना आझाद हिंद एक्सप्रेसमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी आरपीएफच्या पथकाने दोन सिलेंडर जप्त केले. ही कारवाई शनिवार 21 जानेवारी रोजी सकाळी नागपूर रेल्वे स्थानकावर करण्यात आले.
ज्वलनशील पदार्थामुळे कधीही आणि केव्हाही अपघात घडू शकतो. त्यामुळे रेल्वेतून ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करण्यावर बंदी आहे. तसेच रेल्वे स्थानक परिसरात स्वयंपाक करणेही गुन्हा आहे. त्यामुळे पेंट्रीकार चालकांना रेल्वे गाडीत स्वयंपाक करता येत नाही. त्यांना मुख्य स्थानकावरील बेस किचनमधूनच तयार भोजन घ्यावे लागते. असे भारतीय रेल्वेचे नियम आहेत. मात्र, या नियमांना तुडवित आझाद हिंद एक्सप्रेसच्या पेंट्रीचालकाने चक्क गॅस सिलेंडर रेल्वेतून घेवून जात होता.
सकाळी 10 वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर गाडी थांबताच सिलेंडरबाबत आरपीएफला माहिती मिळाली. आरपीएफच्या पथकाने पेंट्रीकारची झडती घेतली. सखोल चौकशीत दोन गॅस सिलेंडर मिळाले. दोन्ही सिलेंडर जप्त करून कायदेशिर कारवाई केली.
अलिकडे पेंट्रीकारचे कंत्राट खाजगी कंपनीला देण्यात आले आहेत. आयआरसीटीसी तर्फे पेंट्रीकारचे कंत्राट दिले आहेत. अटी शर्ती नुसार त्यांना बेस किचनमधून तयार भोजन घ्यावे लागते आणि तेच भोजन प्रवाशांना दिले जाते. त्यामुळे पेंट्रीकारमध्ये भोजन किंवा नास्ता तयार होत नाही. त्यामुळे गॅस सिलेंडरचा काही प्रश्नच उद्भवत नाही. आरपीएफच्या कारवाईमुळे पेंट्रीकार संचालकात धडकी भरली. ही कारवाई मध्य रेल्वेचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनात आरपीएफ निरीक्षक मीना यांच्या पथकाने केली.
@ फाईल फोटो