यवतमाळ :- कृषि विज्ञान केंद्र व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माच्या संयुक्त विद्यमाने डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत नैसर्गिक, सेंद्रिय शेती या विषयावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षणात शेतकऱ्यांना नैसर्गिक व सेंद्रीय शेतीवर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात डॉ.मुळे यांनी आधुनिक शेतीमध्ये जास्त उत्पादन मिळविण्याकरिता शेतकरी रसायनांचा अवाजवी वापर करत आहे. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम देखील त्याच प्रमाणात दिसून येत आहेत. रसायनांच्या अतीवापरावर आळा घालण्यासाठी नैसर्गिक शेती शिवायपर्याय नाही, असे सांगत शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा आधार घेऊन आपल्या व आपल्या जमिनीच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.
आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत सुरु असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. याप्रकल्पाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आणि सेंद्रिय निविष्टा तयार करून वापरण्याकडे लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन केले. वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.नेमाडे यांनी नैसर्गिक शेतीचे महत्व विषद करत माती व पाणी परीक्षणाचे फायदे याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
विषय विशेषज्ञ कीटकशास्त्र डॉ.प्रमोद मगर यांनी रसायनाचा वापर न करता रसायनविरहीत शेती म्हणजेच नैसर्गिक शेती ही काळाची गरज झालेली आहे, असे सांगितले. सहायक प्राध्यापक डॉ.आशुतोष लाटकर, राहुल बोळे, निलेश टाके यांनी नैसर्गिक शेती, सेंद्रिय प्रमाणिकरण, माती आणि पाणी परीक्षण, जीवामृत, बिजामृत, घन जीवामृत, निमास्त्र, ब्रम्हास्त्र, दशपर्णी अर्क सेंद्रिय निविष्टा निर्मिती व त्याचा वापर यावर मार्गदर्शन केले.