– त्रिवेणी संगीत समारोह 2024 शनिवारी व रविवारी
– अमृत प्रतिष्ठान, नागपूर (संगीत, कला, संस्कृती व शैक्षणिक कार्याला समर्पित)
– ” चिन्मय” ४१ ब, सेंट्रल एक्साईज लेआऊट खामला, नागपूर -२५
नागपूर :- गुरुवर्य पं.अमृतराव निस्ताने ‘संगीत निपुण’ भातखंडे संगीत विद्यापीठ लखनऊ, भूतपूर्व प्राचार्य चतुर संगीत महाविद्यालय नागपूर, भारतीय शास्त्रीय संगीत शैलीतील गायक, संगीतकार, संगीतज्ञ, वाग्गेयकार आणि कुशल गुरू अशी त्यांची ओळख. पं राघोबाजी मुठाळ, गायनाचार्य पं.नारायणराव पाठक तसेच पद्मभूषण पं.श्रीकृष्ण नारायण रातंजनकर अशा सुवद्य गुरू लाभलेल्या गुरुवर्यां कडून ग्वाल्हेर आणि आग्रा घेण्याची गायकी त्यांनी आत्मसात केली. पुढे स्वतःच्या कल्पकतेने त्यांनी संगीताचा आविष्कार केला. गायनाच्या मैफिलीत तसेच आकाशवाणी वरुनही त्यांचे गायन प्रसारित होतअसे. ख्याल, धृपद, तराणा या गायकीवर त्यांचे प्रभुत्व होते. नाट्यसंगीत क्षेत्रात ही कुशल संगीतकार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. त्यावेळीच्या ‘नागपूर नाट्य मंडळ’ ‘मित्र समाज’ या नाट्य संस्थांनी सादर केलेल्या बऱ्याच नाटकांचे त्यांनी संगीत दिग्दर्शन केले होते. हार्मोनियम आर्गन व तबला या वाद्यांवरही त्यांचे प्रभुत्व होते. नवीन नवीन रागांची निर्मिती करून चिजा- बंदीशी त्यांनी रचल्या. ‘संगीत’, ‘संगीत कला विहार’ या संगीताला वाहिलेल्या नियतकालिकातून त्या प्रसिद्ध झाल्यात. संगीत सेवेत आपल्या गुरुचे कार्य निष्ठेने चालवून त्यांनी संगीताच्या प्रचार, प्रसार आणि संवर्धनासाठी आपलं अख्ख आयुष्य खर्ची घातलं. अनेक शिष्य तयार केले. चतुर संगीत महाविद्यालयाचे प्राचार्य पद पंचेचाळीस वर्षे भूषवून त्यांनी संस्थेला मानाचे स्थान मिळवून दिले.दरवर्षी आद्य गुरु पं विष्णु नारायण भातखंडे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ संगीत समारोह आयोजित असे ज्यात नवोदित कलाकारांना, विद्यार्थ्यांना तसेच नामवंत ज्येष्ठ गायक वादकांना आपली कला सादर करण्याची संधी मिळत असे. अहोरात्र चालणारा व रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा हा संगीत मेळावा सतत चार दशकांहून अधिक त्यांनी चालविला. संगीताची गंगोत्री अव्याहतपणे वाहत ठेवून समाजाला कृत कृत्य केलं.