मुंबई :- महायुतीतनाशिकच्या जागेवरून सुरू असलेल्या वादाला नवा ट्विस्ट मिळाला आहे. छगन भुजबळ यांनी नाशिकच्या निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केल्यानंतर अजित पवार गटाने या मतदारसंघावरील दावा सोडल्याची चर्चा होती; मात्र आमच्या पक्षाने या मतदारसंघावरील दावा सोडला नसल्याचे अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले.
उमेदवारी जाहीर नाही, तरीही गोडसेंचा प्रचार सुरू
हा मतदारसंघ शिंदेसेनेलाच मिळणार असा दावा करीत खासदार हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला इथून प्रचार सुरू करण्यास सांगितल्याचा दावा केला असून, त्यांनी मतदारसंघात प्रचारही सुरू केला आहे. दुसरीकडे भाजपचे या मतदारसंघात तीन आमदार आहेत, इथे सर्वांत जास्त नगरसेवक भाजपचे आहेत, असे सांगत भाजपने या मतदारंसघावरील दावा कायम ठेवला आहे.
शिंदेसेनेसोबतच भाजपचाही जागेसाठी आग्रह कायम
नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे शिंदेसेनेत असल्याने हा मतदारसंघ आपल्याला मिळावा, असा दावा शिंदेसेनेने सुरुवातीपासून केला आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी हा मतदारसंघ भाजपलाच मिळावा, असा आग्रह लावून धरला आहे. दरम्यानच्या काळात छगन भुजबळ यांचे नाव समोर आल्यानंतर शिंदेसेना आणि भाजपमध्ये नाशिकच्या जागेवरून शांतता होती. मात्र भुजबळांनी माघारीची घोषणा केल्यानंतर पुन्हा या दोन्ही पक्षांतील वाद समोर आला आहे.
अजित पवार गटाचा नाशिकवर दावा का?
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत नाशिकची जागा राष्ट्रवादी लढवत आला आहे. २००४ ते २००९ या काळात राष्ट्रवादीचे देवीदास पिंगळे इथून खासदार होते, त्यानंतर २००९ ते २०१४ या काळात समीर भुजबळ या मतदारसंघातून खासदार होते. नाशिक लोकसभा मतदारसंघात सिन्नरचे माणिकराव कोकाटे आणि देवळालीच्या सरोज अहिरे हे अजित पवार गटाचे दोन आमदार असून इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघात आमची ताकद जास्त असल्याचा दावा अजित पवार गट करत आहे.