– टाऊन हॉल येथे जागतिक क्षयरोग जनजागृती कार्यक्रम
नागपूर : क्षयरोग आजार झाला आहे किंवा नाही हे लवकर लक्षात येत नाही. आजार वाढल्यानंतर जेव्हा लक्षणे दिसू लागतात तेव्हा क्षयरोगाचे निदान होते. मात्र निदान झाल्यानंतर रुग्ण बिमारी पेक्षा भीतीनेच जास्त खचून जातो. अशा वेळी रुग्णाला गरज असते मानसिक आधाराची. एकदा क्षयरोगाचे निदान झाले की ते योग्य उपचाराने बरे होते. त्यामुळे क्षयरोग झाले म्हणजे आयुष्य संपले, असा विचार कुणीही मनात आणू नये, असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी केले.
गुरुवारी (ता. २४) नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे जागतिक क्षयरोग दिनाच्या अनुषंगाने महाल येथील राजे रघुजी भोसले नगर भवन येथे क्षयरोग जनजागृती कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी मेयोचे सहयोगी प्राध्यापक डॉ. ज्ञानशंकर मिश्रा, डॉ. राजेश बल्लाळ, डॉ. सय्यद तारिक, डॉ. झारीया, डॉ. शिल्पा जिचकार, शहर क्षयरोग अधिकारी मनपा, वैद्यकीय अधिकारी डॉ.व्ही.एम. महेश्वर, डॉ. सदफ खतिब व सर्व झोनल वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर्स आदी उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले, भारतात क्षयरोग दुरीकरण मोहिमेला ६० वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेला आहे. २०२५ पर्यंत भारतातून क्षयरोग दूर करावयाचा आहे. हे दुरीकरण अभियान यशस्वी कारणासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. लोकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. क्षयरोग जनजागृतीसाठी आयोजित कार्यक्रमाची मुख्य थीम ‘टीबी संपविण्यासाठी गुंतवणूक करा व जीव वाचवा’ (Invest to End TB save lives) ही आहे. यावेळी डॉ. बहिरवार यांनी Invest चा अर्थ समजावून सांगितलं. I – Invest, N – Notification, V – Valufication, E – Energy, S – Sincerely आणि T – Time. या थीम प्रमाणे आपण जर आपल्या जीवनात बदल केला तर नक्कीच २०२५ पर्यंत भारत क्षयरोग मुक्त होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व आरोग्य चमूने सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी डॉ. बहिरवार यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. प्रास्ताविक शहर क्षयरोग अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार यांनी केले. यावेळी क्षयरोग दुरीकरण मोहिमेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शासकीय तसेच खासगी डॉक्टर्स, अशा वर्कर्स, खासगी स्तरावरील केमिस्ट यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन आरोग्य समन्वयक दीपाली नागरे यांनी तर आभार मेडिकल कॉलेजचे आरोग्य अधिकारी डॉ. माहेश्वर यांनी मानले