– बेस्ट उपक्रमातील १२३ नैमित्तिक कर्मचाऱ्यांना कायम सेवेचे नियुक्तीपत्र
मुंबई :- असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ई-श्रम पोर्टल सुरू केले. राज्यात जवळजवळ अडीच कोटी कामगारांची नोंद या पोर्टलमध्ये झाली आहे. या ई-श्रम नोंदणी कार्ड योजनेच्या माध्यमातून कामगारांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
बेस्टमधील नैमित्तिक कर्मचाऱ्यांना कायम नेमणुकीची नियुक्ती पत्रे प्रदान करण्याचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आज झाला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बेस्ट उपक्रमातील नैमित्तिक कर्मचाऱ्यांना उपक्रमात कायमस्वरूपी सामावून घेण्याची मागणी नैमित्तिक कर्मचारी आणि त्यांच्या संघटना सातत्याने करीत होत्या. या अनुषंगाने मागील १० ते १५ वर्षांपासून कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या १२३ नैमित्तिक कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेऊन नियुक्ती पत्र देण्यात आले. उर्वरित कर्मचाऱ्यांच्या बाबतही लवकरच निर्णय घेण्यात येईल. ई-श्रम पोर्टल यात नोंदीत कामगारांकरिता सामाजिक सुरक्षेचे महामंडळ तयार केले आहे. ज्याच्या माध्यमातून जे लोक असंघटित क्षेत्रात काम करतात त्यांना १४ प्रकारच्या सुविधा देण्यात येणार आहेत. त्यात आरोग्य कवच, अकाली मृत्यू झाल्यानंतरची मदत, मुलांचे शिक्षण, पेन्शन, निवृत्तीनंतर जगण्याची साधने इत्यादी कार्यक्रम हाती घेण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
आमदार प्रसाद लाड यांनी मनोगत व्यक्त केले. बेस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंघल यांनी प्रस्ताविक केले. या कार्यक्रमास आमदार गोपीचंद पडळकर, बेस्टचे मुख्य व्यवस्थापक आर.डी.पाटसुते, कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.