– जवळा येथे योजनांच्या महामेळाव्याचे उद्घाटन
– २७ विभागांच्या ४० स्टाँलद्वारे योजनांची माहिती
– न्यायमूर्तींच्याहस्ते धनादेश, मंजुरी, दाखले वितरण
यवतमाळ :- सर्वसामान्य नागरिकांपर्यंत योजना पोहोचल्या नाही; तर ते योजनांचा लाभच घेऊ शकणार नाही. त्यामुळेच शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा घेतला जात आहे. मेळाव्याच्या माध्यमातून वंचित, गरजू घटकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवा. तालुका विधी सेवा समित्या व वरिष्ठ वकिलांनी यासाठी पुढे यावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व आर्णी तालुका विधी सेवा समितीच्यावतीने आर्णी तालुक्यातील जवळा येथील श्रीगुरुदेव विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर तर अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, उच्च न्यायालय विधीसेवा उप समिती नागपूरचे सचिव अनिलकुमार शर्मा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिन कुणाल नहार, आर्णी विधीसेवा समितीचे अध्यक्ष तथा कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश व्ही.एम.धोंगडे, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष संजय जैन, आर्णी तालुका वकील संघाचे अध्यक्ष दुर्गादास राठोड आदी उपस्थित होते.
विविध घटकांसाठी शासनाच्या वतीने विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. नागरिकांनी देखील योजना समजून घेतल्या पाहिजे. नागरिकांच्या समस्यांचे समाधान, तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विधीसेवा समित्यांच्या वतीने जनजागृती केली जाते. मोफत कायदेशीर मदत व सेवा दिल्या जातात. जिल्हा प्रशासनाचे यासाठीचे कार्य देखील कौतुकास्पद आहे. शासनातील प्रत्येक व्यक्तीने आपले काम पुर्ण क्षमतेने केले तर समाजातील प्रत्येक घटकांना आपण चांगला दिलासा देऊ शकू, असे पुढे बोलतांना न्यायमूर्ती घरोटे म्हणाले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी आपल्या प्रास्ताविकात सर्वांना न्याय, लाभ मिळणे सुलभ व्हावे, यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. न्यायालयाच्यावतीने जलद न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. कायद्याबाबतची साक्षरता, मध्यस्थी प्रक्रिया, महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी असलेल्या कायद्यांची जनजागृती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी योजनांची माहिती गावपातळीवर पोहोचविण्यासाठी न्यायपालिकेचा मोठा सहभाग आहे, असे सांगितले. यावेळी त्यांनी घरकुल, प्रधानमंत्री आवास व घरकुलांच्या विविध योजना, हर घर नल से जल, स्वच्छ भारत मिशन, सुर्यघर, सोलर पँनल योजना, नरेगांतर्गत गोठा, विहीर बांधकाम, मागेल त्याला शेततळे, पीएमएफएमई, पीएम किसान, लाडकी बहीण, माविम, उमेदच्या योजनांबाबत माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन केले.
सुरुवातीस न्यायमूर्ती अविनाश घरोटे व मान्यवरांच्या हस्ते झाडाला पाणी घालून महामेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. मेळाव्यात २७ विभागांच्यावतीने ४० स्टाँल लावण्यात आले होते. न्यायमूर्तींनी प्रत्येक स्टाँलला भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या हस्ते विविध योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश, मंजूरी पत्र, प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी विविध विभागांच्यावतीने लाभार्थ्यांना थेट लाभ व योजनांची माहिती देण्यात आली. मेळाव्यानिमित्त आयोजित आरोग्य शिबिरात विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या.
कार्यक्रमाचे संचलन दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर देवेंद्र पतंगे व रेणुका पतंगे यांनी केले तर आभार जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव कुणाल नहार यांनी मानले. जिल्ह्यातील सर्व न्यायिक अधिकारी, विभागप्रमुख अधिकारी, कर्मचारी, नागरिक, लाभार्थी मोठ्या संख्येने मेळाव्यास उपस्थित होते.