नागपूर :- आदिवासी विकास विभागांतर्गत शिक्षकांची क्षमता चाचणी रविवार दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे. शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी शिक्षकांनी या क्षमता चाचणीत स्वयंस्फुर्तीने सहभागी होण्याचे आवाहन आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.
उच्च माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांच्या चाचणी परिक्षेच्या निकालान्वये शिक्षकांवर कोणत्याही प्रकारची प्रशासकीय कारवाई करण्यात येणार नाही. या परिक्षेद्वारे आवश्यकतेनुसार संबंधीत शिक्षकांच्या क्षमतावृद्धीकरिता प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येणार आहे.
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची गणित व इंग्रजी विषयासह संपूर्ण शैक्षणिक गुणवत्ता व शिकण्याची गती वाढविणे, अध्ययन, कौशल्याचा उपयोग करणे, भविष्यवेधी उपक्रमांतर्गत आलेल्या अडचणी, उजळणी, शंका, समाधान, व चांगले अनुभव व्यक्त करण्यासाठी यापूर्वी तज्ञ मार्गदर्शकांकडुन सहाय्यक प्रकल्प अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, शासकिय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व ग्रंथपाल संवर्गात वेळोवेळी प्रशिक्षण व प्रेरणादायी व्याख्याने घेण्यात आली आहे. प्रत्येक आश्रम शाळेवर विषय मित्र, पिअर लर्निंग, गृप लर्निंग साठी विद्यार्थी तयार करण्यात आले आहे. शाळेच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. याचा लाभ आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालय तसेच जेईई, सिईटी, व एनईटी परिक्षेत पुढील शिक्षणाच्या प्रवेशनिवडीसाठी मोठ्या प्रमाणात झाला आहे.
त्यामुळे शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील सर्व नियमित व तासिका तत्वावरील शिक्षकांनी क्षमता चाचणी परिक्षेत सहभाग घ्य्यावा, असे आवाहन अपर आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी केले असल्याचे आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त दशरथ कुळमेथे यांनी कळविले आहे.