नवी मुंबई :- एकात्मिक बालविकास सेवा योजना, महिला व बालविकास विभाग, नवी मुंबई महानगरपालिका आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने “दिव्यांग बालकांसाठी प्रोटोकॉल” या विषयावर दि.7 मार्च ते 12 मार्च 2025 या कालावधीत शिक्षा प्रशिक्षण केंद्र (ETC) सेंटर, वाशी येथे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. बाल विकास प्रकल्प नवी मुंबई या प्रकल्पातील 226 अंगणवाडी सेविकांना 4 टप्प्यांत देण्यात आले. अशी माहिती एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे यांनी दिली.
दिव्यांग बालकांचा लवकर शोध, निदान आणि उपचार हे त्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण व सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. अशा दिव्यांग बालकांचा शोध घेऊन त्यांना वेळेत योग्य सेवा व उपचार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रशिक्षणामुळे बालकांचे अचूक स्क्रीनिंग होऊन आवश्यक ती वैद्यकीय व इतर मदत या बालकांना देणे शक्य होणार आहे, याचा लाभ नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील दिव्यांग बालकांना होणार आहे.
या प्रशिक्षणामुळे अंगणवाडी सेविकांना दिव्यांग बालकांची लवकर ओळख करून, त्यांना आवश्यक त्या सेवांसाठी मार्गदर्शन करता येणार आहे. दिव्यांग बालकांना अंगणवाडी मध्ये समावेशक पूर्व शालेय शिक्षणाचा लाभ घेता येईल.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार सर्वसमावेशक शिक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण, एक महत्त्वाचे पाऊल आहे. या प्रशिक्षण प्रायोगिक पातळीवर एका प्रकल्पात राबविण्यात आलेले आहे. आगामी काळात दिव्यांग बालकांसाठी प्रोटोकॉल हे प्रशिक्षण महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये राबविण्याचा मानस आहे.
महिला व बालविकास विभाग मंत्रालय नवी दिल्ली यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये दिलेल्या दिव्यांग बालकांसाठी प्रोटोकॉलच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या दिव्यांग बालकांसाठी प्रोटोकॉलवर आधारित दिव्यांग बालकांच्या स्क्रीनिंग, निदान व उपचार प्रक्रिया या प्रशिक्षण देण्यात आले. अशी माहिती एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे यांनी दिली.